बँक खात्‍यातून गेलेली रक्‍कम २१ महिन्यांनी मिळाली परत

सम्राट महाजन
Friday, 29 January 2021

बॅंकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने श्री. वाणी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात 9 ऑक्टोबर 2019 रोजी याबाबत अर्ज करुन दाद मागितली.

तळोदा (नंदुरबार) : अनधिकृत व्यवहारातून लंपास झालेली रक्कम तब्बल 21 महिन्यांचा कालावधीनंतर संबंधित तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. खात्यातून लंपास झालेले 85 हजार आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी 5 हजार व अर्जाचा खर्चापोटी 3 हजार असे एकूण 93 हजार रुपये संबंधितांचा खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामुळे तक्रारदार यांनी आनंद व्यक्त केला असून इतरांनी देखील कोणत्याही क्षेत्रात फसवणुक झाल्यास दाद मागावी अश्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तळोदा येथील जेष्ठ नागरिक प्रमोदचंद्र फुंदीलाल वाणी व रजनीकांता वाणी यांचे भारतीय स्टेट बँक तळोदा शाखेत संयुक्त बचत खाते असून या खात्यावरुन 2 एप्रिल 2019 रोजी अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डाच्या वापर करुन 40 हजार रुपये दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यांवर ट्रान्सफर केलेत. त्याच दिवशी 10 हजार रुपये रोकड काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल 2019 रोजी 15 हजार रुपये ट्रान्सफर झाले; तर 20 हजार रुपये रोकड काढण्यात आली असे एकूण 85 हजार रुपये खात्यावरुन अज्ञात इसमाने 2 दिवसात काढले. श्री. वाणी काही दिवसानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. बँकेच्या शाखा अधिकारी यांच्याकडे प्रमोदचंद्र वाणी यांनी लेखी व तोंडी तक्रार केली तसेच पोलीस ठाण्यात खबर दिली.

तक्रार निवारण आयोगाकडून दिलासा
बॅंकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने श्री. वाणी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात 9 ऑक्टोबर 2019 रोजी याबाबत अर्ज करुन दाद मागितली. जवळपास वर्षभरानंतर तक्रारदार श्री. वाणी यांच्या खात्यातून अनधिकृत व्यवहारातून लंपास झालेली एकूण 85 हजार रुपयांची रक्कम तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण 5 हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी 3 हजार रुपये असे एकूण 93 हजार रुपये रक्कम तक्रारदार वाणी यांना परत करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नंदुरबारने भारतीय स्टेट बँकेच्या तळोदा शाखेला दिले होते. सदर प्रकरणाचा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नंदुरबारचे अध्यक्ष एस. पी. बोरवाल, सदस्या श्रीमती बी. पी. केतकर व सदस्य एम. एस. बोडस यांनी दिला होता.

21 महिन्यानंतर रक्कम जमा
श्री. वाणी यांच्या खात्यातून अनधिकृत व्यवहारातून लंपास झालेली रक्कम तब्बल 21 महिन्यानंतर काल गुरुवार 28 जानेवारी रोजी त्याच्या खात्यात जमा करण्यात आली. या प्रदीर्घ काळात प्रमोदभाई वाणी यांना अँड. दिपक वाणी, अँड. जयेश शहा, अँड. नुरमंहम्मद शेख, अँड. निलेश देसाई तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे नाशिक विभागीय अध्यक्ष मार्तंड (बाबा) जोशी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किर्तीभाई शहा, जिल्हा संघटक आर. ओ. मगरे सर, तालुकाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, तालुका संघटक रमेश भाट व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news taloda bank account cash despach