चक्‍क गोल्ड लोन काढले अन्‌ भरले वीजबील

mahavitaran farmer
mahavitaran farmer

तळोदा (नंदुरबार) : दोन महिन्यांपासून बंद असलेल्या आमलाड शिवारातील ३९ क्रमांकाच्या रोहित्रावरील कनेक्शनधारक शेतकरी सुधाकर काशिनाथ पिंपरे यांनी आपले उसाचे कोवळे पीक वाचवण्यासाठी चक्क गोल्ड लोन काढून आपले वीज बिल भरले आहे. तरीही बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळत नसून उलट पिंपरे यांच्यावरच रोहित्रावरील दुसऱ्या शेतकऱ्यांनीही वीज बिल भरावे, असा दबाव टाकला जात आहे. महावितरणच्या या आडमुठे धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून कंपनीच्या कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
बिघाड झालेले रोहित्र बदलून देण्याची विनंती शेतकरी करत असूनही कंपनीने रोहित्र बिघाड झाल्याचा रिपोर्ट अजूनही पाठवलाच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रोहित्रावरील कनेक्शनधारक सर्व शेतकऱ्यांनी विज बिल भरले तरच रोहित्र चालू करण्याची भूमिका महावितरण कंपनीने घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे प्रामाणिकपणे व कर्ज काढून विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचे होत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. 

कृषी योजनेतंर्गत लाभ तरीही
महावितरण कंपनीकडून सध्या कृषी योजनेअंतर्गत सवलती देऊन शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यानुसार अनेक शेतकरी वीज बिल भरून सवलतीचा लाभ घेत आहेत. मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले आहे, त्या शेतकऱ्यांना आपल्या रोहित्रावरील सर्व कनेक्शनधारक शेतकऱ्यांनी वीज बिल भरले तरच रोहित्र सुरू केले जाईल, असे सांगून रोहित्र बसवण्यास किंवा वीजपुरवठा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांना स्वतः मनवावे लागत आहे. 
 
उसाचे पेमेंट आल्यावर भरणा 
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडे उसाचे पेमेंटचे पैसे अजून आलेले नाहीत. ज्यांच्याकडे पैसे होते ते शेतकरी वीज बिल भरत आहेत. उसाचे पेमेंट आल्यानंतर वीजबिल भरण्यामध्ये वेग येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे मात्र पिके वाचवण्याची कसरत करावी लागत असल्याचे शेतकरी व्यथा मांडत आहेत. 
 
शासनाच्या कृषी योजना २०२० नुसार सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरून योजनेतील सवलतीच्या लाभ घ्यावा तसेच चालू बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीला सहकार्य करावे. 
- इमरान पिंजारी, कनिष्ठ अभियंता, महावितरण तळोदा 
 
दोन महिन्यापासून बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळालेले नाही. त्यासाठी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. नव्याने लावलेल्या ऊसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. 
- प्रशांत माळी, शेतकरी तळोदा 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com