
तळोदा - बोरद रस्त्यावरील कढेल फाट्याजवळ पपईच्या बागेत सोमवारी सकाळी दहाला खुनाची घटना उघडकीस आली होती. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपासाची चक्रे फिरवली होती.
तळोदा (नंदुरबार) : तालुक्यातील कढेल फाट्याजवळ झालेल्या खुनाच्या घटनेच्या पोलिसांनी एका दिवसात छडा लावला असून सख्या मेहुण्याने खरेदीची दुचाकी स्वतःकडे ठेवण्याचा कारणावरून शालकाच्या खून केल्याचा प्रकार घडला आहे. घटनेतील मृताचे नाव आकाश शंकर वसावे (वय १७, रा. रोजवा पुनर्वसन) असे असून नात्याने मेहुणा असलेल्या भुरजी हुरजी पावरा (वय २०, रा. रेवानगर) याने खून केल्याची कबुली दिली आहे. घटनेतील संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
तळोदा - बोरद रस्त्यावरील कढेल फाट्याजवळ पपईच्या बागेत सोमवारी सकाळी दहाला खुनाची घटना उघडकीस आली होती. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपासाची चक्रे फिरवली होती. स्वतः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सायंकाळपासून तळोदा पोलिस स्टेशन येथे उपस्थित राहत तपासाची सूत्रे हलवली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तपासाला गती देत दोन- तीन संशयितांना ताब्यात घेतले.
दोघांमध्ये झाले भांडण अन्
संशयितांकडे विचारपूस करून पोलिसी खाक्या दाखवताच सुगावा लागला. रेवानगर येथील भुरजी पावरा याने गुन्हा घडल्याची कबुली दिली. नात्याने मेहुणा व शालक असलेल्या भुरजी पावरा व आकाश वसावे यांनी नंदुरबार येथून दुचाकी विकत आणली होती. त्यावरून भुरजी वसावे याची नियत बिघडल्यामुळे दुचाकी कोणाकडे राहणार यावरून दोघांचे भांडण झाले. त्यातुन हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी भुरजी पावरा याला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांकडून एका दिवसात तपास
दरम्यान या तपासात स्वतः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सहा तासाहून अधिक काळ पोलिस स्टेशनमध्ये थांबून आरोपींना पकडण्यात मोठी भूमिका बजावली. त्यात पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, अभय मोरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दीपक गोरे, स्थानिक हेड कॉन्स्टेबल युवराज चव्हाण, अजय पवार, रवींद्र कोराळे यांनी तपासाला गती देऊन एकाच दिवसात गुन्ह्याचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे