esakal | तळोद्यात लोकसहभागातून ऑक्सिजनयुक्त बेड सेंटर

बोलून बातमी शोधा

oxygen bed
तळोद्यात लोकसहभागातून ऑक्सिजनयुक्त बेड सेंटर
sakal_logo
By
टिम इ सकाळ

तळोदा (नंदुरबार) : कोरोना रुग्णांसाठी येथील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारतीत लोकसभागातून २५ ऑक्सिजनयुक्त बेडचे कोविड सेंटर बुधवार (ता. ५)पासून कार्यान्वित होत असून, यात काही स्थानिक डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. आमदार राजेश पाडवी मित्रमंडळ, पालिका प्रशासन व असंख्य दात्यांच्या दातृत्वातून हे कोविड सेंटर उभारल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

येथील आमदार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजप तालुकाध्यक्ष बळिराम पाडवी, माजी तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, प्रा. विलास डामरे, स्वीय सहाय्यक वीरसिंग पाडवी, गुड्डू वळवी, जगदीश परदेशी आदी उपस्थित होते. आमदार पाडवी म्हणाले, की रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची होणारी भटकंती थांबण्यासाठी हे कोविड सेंटर उभारत आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक सकस आहार व औषधी मोफत उपलब्ध होणार असून, या कोविड सेंटरमध्ये शहरातील काही डॉक्टर आपली सेवा देणार आहेत, तर मेडिकल मोफत पुरवठा करणार आहे.

वाढदिवसाच्या खर्चाऐवजी सेंटरला देणगी

मतदारसंघातील रुग्णांना दवाखान्यात ने-आन करण्यासाठी लवकरच चार रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगत ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अगोदर लसीकरण करीत नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, असे सांगत ५ मे माझ्या वाढदिवसाला पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हारतुरे, बॅनर यावर खर्च न करता तो पैसा या कोविड सेंटरला देणगी स्वरूपात द्यावा, असे आवाहन केले.

मतदारसंघातील नागरिकांचे समुपदेशन

कोरोनाबाबत आजपण विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत दिसून येत असून, त्यांना योग्य माहिती मिळावी, यासाठी तळोदा तालुक्यात चार, तर शहादा तालुक्यात चार, असे एकूण आठ व्यक्ती मतदारसंघातील नागरिकांचे समुपदेशन करणार असल्याची माहिती आमदार पाडवी यांनी या वेळी दिली. हे आठ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या अडचणी दूर करण्यासाठी व पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांनी स्वॅब द्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.