एकीकडे पाणी अडवा, पाणी जिरवा तर दुसरीकडे वाहतेय पाण्याची गंगा..

save water
save water

तळोदा (नंदुरबार) : प्रशासन एकीकडे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियान राबवीत पाणीबचतीचा महत्त्वपूर्ण असा संदेश देते. मात्र तळोद्यात अगदी याउलट स्थिती दिसून येत आहे. येथील एका अतिशय जुन्या बोअरवेलमधून गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याची गंगा बेसुमार वाहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यायला ना पालिका प्रशासनाकडे वेळ आहे, ना या बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग करणाऱ्या नागरिकांकडे. 
तळोद्यातील पोलिस वसाहतीसमोर एक फार जुना हौद (हाळ) असून, या ठिकाणी पालिकेने बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था फार पूर्वीपासून केलेली आहे. पूर्वी या ठिकाणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पाणी भरण्यासाठी येत होते. तसेच मोठ्या संख्येने प्राणीही पाणी पिण्यासाठी येत. पालिकेच्या अग्निशमन बंबही याच ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत होता. त्यासाठी स्वतंत्र जोडणीही केली होती. कालांतराने हौदाची प्रचंड दुरवस्था झाल्याने आता हा हौद फक्त नावालाच उरला आहे. आता या ठिकाणी ना पालिकेचा अग्निशमन बंब पाणी भरण्यासाठी येतो ना परिसरातील नागरिक. आता या हौदावरील बोअरवेलचा उपयोग जवळच असलेल्या पोलिस वसाहतीतील कर्मचाऱ्यांना व परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी होत असून, पाइपलाइनच्या माध्यमातून त्यांना पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी रोज सकाळी अर्धा ते एक तास बोअरवेलचे पाणी सोडण्यात येते. 

पुढाकार घेणार कोण
परिसरातील काही व्यापारीही या बोअरवेलचा वापर करतात. मात्र पूर्वी अग्निशमन बंब व पाणी भरण्यासाठी जे स्वतंत्र जोडणी काढले होते, त्यांना अजूनही झाकण लावून बंद केलेले नाही. त्यामुळे बोअरवेल सुरू करताच अनेकदा या जोडणीतून पाणी वाहून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे, मात्र याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. त्यामुळे पाण्याची ही नासाडी थांबविण्यासाठी कोण पुढाकार घेणार हेच पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 
वेगळी नळजोडणी काढावी 
या ठिकाणी परिसरातील काही छोटे-मोठे व्यावसायिक नियमितपणे तर आपत्ती काळात नागरिक पाणी भरण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र जोडणी आहे, त्यावर नळ बसविणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्थित सोय होत पाण्याची बेसुमार नासाडीही थांबणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com