भाकरीचा छोटासा तुकडा; त्‍यातून एक घास बकरीचा; एक घास माझा..

सम्राट महाजन
Sunday, 24 January 2021

ग्रामीण भागातील नागरिक आजही बऱ्यापैकी निसर्गाशी एकरूप असून, पर्यावरणात वावणाऱ्या प्राणिमात्रांबाबत प्रेम, आत्मीयता, आपुलकी बाळगून आहेत, हे एका लहानशा मुलीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 

तळोदा (नंदुरबार) : ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असतो, हे तर सर्वांना माहीत आहे, मात्र ‘एक घास शेळ्यांचा..’ पण असतो, कदाचित हे कोणालाच माहीत नसेल. आपल्याजवळील भाकरीच्या छोट्याशा तुकड्यामधून एक घास स्वतः, तर दुसरा घास शेळ्यांना खाऊ घालत नि:स्वार्थ भावना व निरपेक्ष प्रेम अजूनही जिवंत असल्याचे दुर्गम भागातील चिमुरडीने दाखवून दिले आहे. 
सध्याच्या काळात सर्वत्र स्वार्थीपणा प्रचंड वाढला असून, सख्ख्या भावंडांमध्येही स्वार्थामुळे आता पूर्वीसारखे प्रेम, आपुलकी, आत्मीयता बघावयास मिळत नाही. मग जिथे माणसांमध्ये एकेमकांबद्दल आपलेपणाची भावना नसेल, अशा वातावरणात पशु, प्राणिमात्रांबाबत ती भावना कशी बघायला मिळेल. मात्र ग्रामीण भागातील नागरिक आजही बऱ्यापैकी निसर्गाशी एकरूप असून, पर्यावरणात वावणाऱ्या प्राणिमात्रांबाबत प्रेम, आत्मीयता, आपुलकी बाळगून आहेत, हे एका लहानशा मुलीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 

भाकरी खाण्यास सुरवात अन्‌
केलवापाणी (ता. तळोदा) गावाच्या परिसरात एक चिमुरडी सकाळी अकराच्या सुमारास आपल्या शेळ्यांना चारत होती. शेळ्यांना चारता-चारता त्या चिमुरडीला भूक लागली म्हणून तिने आपल्या सोबत नेलेल्या भाकरीचा तुकडा हातात ठेवत एक-एक घास खाण्यास सुरवात केली. तेवढ्यात तिथेच गवत खाणाऱ्या शेळ्या तिच्याजवळ गेल्या व त्या चिमुरडीच्या आजूबाजूला रेंगाळू लागल्या. त्या चिमुरडीला मुक्या प्राण्यांची भाषा कदाचित समजली म्हणून की काय, तिने क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील भाकरीच्या तुकड्यामधील एक घास स्वतः खात, दुसरा घास त्या शेळ्यांना एकएक करून भरवू लागली. दरम्यान, त्या मुक्या शेळ्यांना घास भरवताना त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. एक-एक घास करत क्षणार्धात तिचा हातातील भाकरीचा तुकडा संपला. परंतु स्वतःला भूक लागल्यावरही भाकरीच्या छोट्याशा तुकड्यामधून अर्धा हिस्सा मुक्या प्राण्यांना देत माणसांनी आपसांत प्रेम, आपुलकी, संवेदनशीलता बाळगलीच पाहिजे, हाच संदेश ही चिमुरडी या घटनेतून सर्वांना देत आहे. 
 
दुर्गम भागात देण्याची संस्कृती टिकून 
स्वतःला एका भाकरीची भूक असेल, तर ती खाणे ही प्रवृत्ती. आपल्याला एका भाकरीची भूक असताना दुसऱ्याकडील भाकरी हिसकून घेणे ही झाली विकृती आणि एका भाकरीची भूक असतानाही आपल्या भाकरीतून अर्धी भाकर दुसऱ्याला देणे ही झाली संस्कृती. आजही दुर्गम भागात ही संस्कृती टिकून असून, ती जपली जात आहे, हेच या चिमुरडीच्या कृतीतून दिसून येते.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news taloda small girl eating and goat