नव्या वर्षात चार ग्रहण; मात्र सूर्यग्रहण पाहण्यासाठी २०३१ ची वाट 

फुंदीलाल माळी
Friday, 1 January 2021

मानवाची उत्कंठा व कुतूहल नेहमीच जागविणाऱ्या भौगोलिक खगोलीय घटना म्हणजे सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचा घटना होत. या सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचा घटना २०२१ या नवीन वर्षात चार वेळा घडणार आहेत.

तळोदा (नंदुरबार) : २०२१ या नव्या वर्षात चार ग्रहणे होणार असून यात दोन सूर्यग्रहण, तर दोन चंद्रग्रहण असणार आहेत. मात्र त्यातील एकही ग्रहण महाराष्ट्रातून अथवा नंदुरबार जिल्ह्यातून दिसणार नाही. महाराष्ट्रातील व पर्यायाने नंदुरबार जिल्ह्यातील खगोलप्रेमींना सूर्यग्रहण पाहण्यासाठी २०३१ ची वाट पाहावी लागणार आहे. तर चंद्रग्रहण २०२२ मध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे येणारे २०२१ हे वर्ष खगोल प्रेमींसाठी निराशा आणणारे व संधीची वाट पाहायला लावणारे असणार आहे. 

मानवाची उत्कंठा व कुतूहल नेहमीच जागविणाऱ्या भौगोलिक खगोलीय घटना म्हणजे सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचा घटना होत. या सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचा घटना २०२१ या नवीन वर्षात चार वेळा घडणार आहेत. मात्र यातील एकही ग्रहण महाराष्ट्रातून अथवा नंदुरबार जिल्ह्यातून दिसणार नाही. त्यामुळे नवीन वर्षात खगोलप्रेमींना ग्रहण पाहण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

एक देखील ग्रहण नाही दिसणार
वर्षातील पहिले ग्रहण २६ मे रोजी खग्रास चंद्रग्रहणाचा रूपाने दिसणार आहे. हे ग्रहण भारतातील अतिपूर्वेकडील राज्यातून म्हणजेच ईशान्य भारतातून खंडग्रास स्थितीत असणार आहे. त्यानंतर १० जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. वर्षातील तिसरे ग्रहण १९ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहणाच्या रुपाने येणार आहे. मात्र ते देखील भारतातून दिसणार नाही. तर वर्षातील शेवटचे ग्रहण चार डिसेंबर रोजी होणार आहे. ते खग्रास सूर्यग्रहण असणार आहे मात्र वर्षातील शेवटचे ग्रहण देखील संपूर्ण देशातून दिसणार नसल्याने २०२१ यावर्षी खगोलप्रेमींना ग्रहण पाहण्याची संधी मिळणार नाही. २०१९ च्या २६ डिसेंबरला देशातील बहुतांश भागातून सूर्यग्रहणाचा आनंद घेण्यात आला होता. मात्र तशी संधी मिळण्यासाठी व सूर्यग्रहणाचा आनंद घेण्यासाठी देशवासीयांना २०३१ सालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

दहा वर्षाची प्रतिक्षा
२१ मे २०३१ रोजी होणारे सूर्यग्रहण दक्षिण भारतातून पाहता येणार आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाचा आनंद मिळण्यासाठी महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा वासियांना मोठा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तर चंद्रग्रहण लवकरच पाहता येणार आहे. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणारे चंद्रग्रहण देशातून दिसू शकणार असल्याने खगोलप्रेमींना चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे, मात्र २०२१ साली खगोलप्रेमींना ही संधी मिळणारच नसल्याने खगोलप्रेमींमध्ये काहीशी निराशा आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news taloda solar eclipse lunar eclipse this year