esakal | अहवाल पॉझिटीव्ह..सुरू झाल्‍या प्रसुतीच्या वेदना; उपजिल्हा रुग्णालयाचा नकार अन्‌
sakal

बोलून बातमी शोधा

birth on the street

रांझणी येथील सोनाली गोसावी यांची चार दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयातही दाखल करून घेण्यात आले नाही.

अहवाल पॉझिटीव्ह..सुरू झाल्‍या प्रसुतीच्या वेदना; उपजिल्हा रुग्णालयाचा नकार अन्‌

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : रांझणी (ता. तळोदा) येथील २५ वर्षीय गर्भवतीला बुधवारी (ता. ७) पहाटे प्रसूतीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. नाइलाजास्तव प्रसूतीसाठी शहादा येथे नेत असता, महिला रस्त्यातच प्रसूत झाली. प्रसूतीसाठी फरपट झालेल्या महिलेच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त होत असून, जबाबदारी झटकणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली. 
रांझणी येथील सोनाली गोसावी यांची चार दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयातही दाखल करून घेण्यात आले नाही. होम क्‍वारंटाइन राहण्याच्या व प्रसूतीवेळी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी (ता. ७) पहाटे साडेतीनच्या सुमारास गर्भवती सोनालीला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने आशा कार्यकर्त्या मंगला मराठे यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला प्रचंड वेदना होत असतानाही येथे डिलिव्हरी होणार नाही, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत आपली जबाबदारी झटकून गर्भवती सोनालीला वाऱ्यावर सोडले. 

पतीची धावपळ
दरम्यान, सोनालीचा पती लेखू गोसावी यांनी गर्भवतीच्या वेदना वाढत असल्याने भाड्याची गाडी करून शहादा येथे खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयात नेत असताना रस्त्यावरच सोनाली प्रसूत झाली. चार दिवसांपूर्वी मातेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने नवजात शिशूला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी शहाद्यातीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचार करून नवजात शिशू व आईला रात्री डिस्चार्ज दिल्याचे समजते. 
 
..अन्‌ अश्रू अनावर 
पत्नीचा जीव कुठल्याही परिस्थितीत वाचला पाहिजे, म्हणून पती लेखू गोसावी खासगी वाहनाने शहादा गाठत असताना, रस्त्यातच पत्नीची प्रसूती झाली. या वेळी आई अरुणा गोसावी यांनी सुनेचे गाडीतच सुखरूप बाळंतपण करून त्यांचा व बाळाचा जीव वाचविला. बाळ किंवा मातेचे रस्त्यातच काही बरेवाईट झाले असते, तर किती अनर्थ घडला असता या विचाराने लेखू गोसावी यांचे अश्रू अनावर झाले होते. 
 
ऐनवेळी नकार दिल्याने खासगी वाहन मिळविण्यापासून ते खासगी दवाखान्यात नेईपर्यंत आमची आर्थिक, शारीरिक व मानसिक फरपट झाली. रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 
-सागर गोसावी, रांझणी  

संपादन- राजेश सोनवणे

loading image