Video पोटात ना अन्नाचा कण...ना पायात चालण्याचा त्राण तरीही उन्हात रस्ता कापत चालले 

दीपक कच्छवा
Friday, 17 April 2020

या मजुरांची सर्व माहिती घेण्यात आली आहे.याबाबत महसुल विभागाला कळविले आहे. त्या सर्वांची ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यांना महसुल विभाच्या आदेशानुसार पुढील व्यवस्था करण्यात येईल. 
- सचिंन बेंद्रे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेहूणबारे

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः संसाराला हातभार लागावा म्हणून मध्यप्रदेशातून मराठवाड्यात शेती कामासाठी गेलेले मजूर आपल्या स्वतःची शेती तयार करण्यासाठी आता घराकडे वाट तुडवत निघाले आहे. सुमारे चाळीस जणांचा हा लोंढा कन्नडचा घाट पार करत चाळीसगाव मार्गे मार्गक्रमण करत आहे. पोटात अन्नाचा कण नाही अन्‌ पायात चालण्याचे त्रास तरीही अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या तिव्र झळांमध्ये डांबरी रस्त्यावरून मार्गक्रमण करत सारे आपल्या घराकडे पायीच मार्गस्थ झाले. 

 

मध्यप्रदेशातील सेंधवा जिल्ह्यातील जलेलाबाद येथील हे आदिवासी मजुर औरंगाबाद जिल्ह्यातील हतनुर येथे गेल्या काही महिन्यापासून आले काढणीच्या कामासाठी गेले होते. त्यांचे हे काम संपले त्यामुळे या आदिवासी कुटुंबाची परवड सुरु झाली. पावसाळ्याचे दिवस जवळ येण्यापुर्वी घरची शेती तयार करण्यासाठी हे आदिवासी मजुर घराकडे जाण्यासाठी धडपड करू लागले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने अशा परिस्थितीत या मजुरांची वाताहात होवू लागली. हातावर पोट असलेल्या या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होवू लागली. त्यामुळे कसेही करून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. लहान मुले, वृद्ध, महिला असा सुमारे 40 जणांचा काबिला वाहन मिळणार नाही म्हणून दोन दिवसापूर्वीच पायी हतनूरहून निघाले होते. 

डोळ्यात आनंदाश्रू टपकले 
लॉकडाऊनच्या काळात कुणाला कोरोनाचा संसर्ग होवू नये; म्हणून नागरीकांना घरातच थांबण्यासाठी दिवसरात्र तहानभूक विसरून आपले कर्तव्य बजावत असतांना गरीब मजुरांच्या वेदनेलाही फुंकर घालत मेहूणबारे पोलीसांनी इतरांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. पोलीसांच्या रूपानेच देव धावून आल्याने या गरीब आदिवांसींच्या डोळ्यात आनंदाश्रू टपकले. मजल दरमजल करीत हे मजुरांनी आज दुपारी अकरा वाजता भोरस शिवार ओलंडले. चालण्याचे त्राण नाही, पोटात अन्नाचा कण नाही अशा स्थितीतही ते अंग भाजून काढणाऱ्या उन्हात रस्ता कापत होते. 

टरबूज, केळी अन्‌ बिस्कीट 
मेहूणबारे शिवारात रस्त्याच्या कडेला मजुरांचा हा ताफा काही क्षण विश्रांतीसाठी थांबला. मेहूणबारेकडे येत असल्याची माहिती येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरक्षक सचिन बेंद्रे यांना कळताच ते या गरीब मजुरांच्या मदतीला धावून आले. यांना त्यांनी एका ठिकाणी थांबवून विविध फळे, बिस्कीटे वाटप करून जेवणाचीही व्यवस्था केली. मेहूणबारे पोलीसांनी जणुकाही मायेची उबच दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तातडीने उपनिरीक्षक हेमंत शिंदे, हवालदार योगेश मांडोळे, राजेंद्र निकम, प्रकाश पाटील, जयेश पवार, रवि माळी, वाल्मीक मोरे आदीनी तात्काळ हालचाली करीत टरबुज, खरबुज, केळी आदी फळफळावळे तसेच लहान मुलांसाठी बिस्कीटे घेऊन घटनास्थळ गाठले आणि या भूकेल्या मजुरांना मदतीचा हात दिला. 

मजुरांना मदतीचा हात 
मेहुणबारे येथील पोलीसांनी या 40 मजुरांची जेवणाची सोय करून अन्नाचा घास त्यांच्यापर्यंत पोहचवला.कोरोनाचे संकट असतांना देखील कर्तव्य बजावत असतांना पायी जाणाऱ्या मजुरांच्या मुखी अन्नाचा घास भरवला.घटनास्थळी सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनीही भेट देत या मजुरांना पुरसे जेवण मिळाले की नाही याची माहीती घेतली.धावपळीची नोकरी असतांना देखील मेहूणबारे पोलीसांनी माणुसकीची ज्योत तेवत ठेवली आहे.पोलीसांच्या या कार्यालया सलाम केला जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aadivashi people going home mehunbare village road