क्वारंटाईन केलेल्या दोघांचा आदर्शवत उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

पिंगळवाडे (ता.अमळनेर) येथील दोन युवकांनी त्यांच्या कृतीतून आपले वेगळपण दाखवून दिले आहे.रिकाम्या वेळेत करत आहेत शाळेची साफसफाई व रोपांची देखभाल करीत आहेत.
 

अमळनेर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींना गावाच्या बाहेरील इमारतीत किंवा जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. अनेक जण हा वेळ अनिच्छेने काढत आहेत. तर अनेक गावात ह्या व्यक्ती क्वारंटाईन न राहता नियमाच्या विरुद्ध वागत आहेत. मात्र तालुक्यातील पिंगळवाडे (ता.अमळनेर) येथील दोन युवकांनी त्यांच्या कृतीतून आपले वेगळपण दाखवून दिले आहे.रिकाम्या वेळेत करत आहेत शाळेची साफसफाई व रोपांची देखभाल करीत आहेत.

हेपण वाचा - देवळीच्या अभियंत्याचा नायजेरियात कोरोनाने मृत्यू; पत्नीलाही कोरोना मृत्यूशी देतेय झुंज 

अमोल विठ्ठल देशमुख (वय २५) हा पुणे येथून  १० एप्रिल रोजी तर दिनेश नगराज पाटील (वय ३०) हा इंदोर येथून दि. १६ एप्रिल रोजी गावात आले. गावातील ग्रामस्थ व पोलिस पाटील गजेंद्र पाटील यांनी त्यांना जि.प. शाळेत  क्वारंटाईन केले. क्वारंटाईन काळात अनिच्छेने वेळ घालवण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग करून काहीतरी चांगले काम करावे अश्या विचाराने त्यांनी दररोज जिल्हा परिषद शाळेची साफसफाई करणे सुरू केले. तसेच शाळेच्या आवारात असलेल्या रोपांची काळजी घेऊन त्यांना दररोज पाणी टाकण्यास सुरुवात केली. गावाचे पोलिस पाटील गजेंद्र पाटील व मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी त्यांना प्रोत्साहन देत सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेची सेवा करण्याची मिळालेली ही संधी आहे, अशी भावना या दोघांनी व्यक्त केली.
तसेच क्वारंटाईन म्हणजे आपल्याला इतरांपासून वेगळे करण्याची भावना न ठेवता आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी आपण इथे राहत आहेत ही भावना इतरांमध्ये रुजावी अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली. आज दि. २१ रोजी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या आदेशानुसार दोंघाना त्यांच्या घरीच विलीगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalaner pingalwade school quarantine two boy