दोन महिन्यानंतर शहर झाले मोकळे; नागरीकांना नाही भिती कोरोनाची 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

अमळनेरला कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभरावर पोचली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनता कर्फ्यू लावून जनजागृती करून कोरोनाला थोपविण्यासाठी कंबर कसली.

अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने शहर बंद होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नॉन रेड झोन भागात व्यवहार सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आज तब्बल साठ दिवसानंतर एकच गर्दी उसळली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, नागरिक बिनधास्त वावरत आहेत. 
अमळनेरला कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभरावर पोचली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनता कर्फ्यू लावून जनजागृती करून कोरोनाला थोपविण्यासाठी कंबर कसली. गेल्या दोन दिवसापासून एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, सुमारे ९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ३१ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू असला, तरी शहरातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्‍यक सेवा फक्‍त सुरू होत्या. अर्थचक्रास काही अंशी गती मिळावी, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा करून नियमांचे अधिन राहून शहर सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर आज शहर खुले झाले आहे. बाजारात सर्वत्र झुंबड उडाली आहे. 

नियमांची पायमल्ली 
लॉकडाऊनमध्ये शहर सुरू झाले असले, तरी पॉझिटिव्ह रूग्ण असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर आहे. या परिसरात सर्व व्यवहार बंदच ठेवण्यात आले आहेत. शहरात इतर भागातही नियमांचे सक्‍तीचे पालन करण्याचे आवाहन आमदार अनिल पाटील व प्रशासनाने केले आहे. कोणीही नियम मोडल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, तरीही नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून फिरत असल्याचे दिसून येत आहे. 

तहसीलदारांचे आदेश 
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आदेश जारी केला असून, याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेर जाण्याची व आत येण्याची परवानगी नाही. तालुक्यात औषधी व्यावसायिक, नर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, सॅनिटेशन पर्सन, ॲम्बुलन्स सुरू राहतील. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी, दुचाकीवर एकच वक्‍ती, तीन चाकी वाहनावर दोन अधिक एक, चार चाकी वानात दोन अधिक एक व्यक्‍तींना प्रवास करता येईल. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सर्व दुकाने खुली राहतील. दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन नसल्यास तत्काळ बंद करण्यात येतील. मालक आणि ग्राहक सहा फुटांचे अंतर असावे. तोंडाला मास्क अनिवार्य. अंत्ययात्रेस २० जणांनाच परवानगी. दारू, पान, तंबाखू सार्वजनिक ठिकाणी वापर करण्यास बंदी. दुकानांवर सॅनिटायझरची व्यवस्था बंधनकारक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner two month open market corona virus