पहिल्याच पावसात 'जलयुक्‍त‍'च्या बंधाऱ्यांना गळती 

श्‍यामकांत पाटील
मंगळवार, 2 जुलै 2019

गोवर्धन (ता. अमळनेर) ः जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील सिमेंट बंधारे, बांधबंदिस्ती, खोलीकरण आदींची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पहिल्याच व अल्पशा पावसातच त्यांना गळती लागली असून, या कामांची चौकशी करावी, अशी मागणी पिंगळवाडेच्या सरपंच व शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांकडे केली आहे. 

गोवर्धन (ता. अमळनेर) ः जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील सिमेंट बंधारे, बांधबंदिस्ती, खोलीकरण आदींची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पहिल्याच व अल्पशा पावसातच त्यांना गळती लागली असून, या कामांची चौकशी करावी, अशी मागणी पिंगळवाडेच्या सरपंच व शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांकडे केली आहे. 
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पिंगळवाडे शिवारात मार्च २०१९ ते मे २०१९ दरम्यान जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत दोन जुने सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरणाच्या नावाने फक्‍त आजूबाजूला मातीचा भराव करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. आम्ही काम सुरू असताना संबंधित अधिकारी, ठेकेदारास वारंवार निकृष्ट काम होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले. मात्र, तरीही त्यांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे ४ लाख ३२ हजार ४८६ रुपये (पहिला टप्पा), २ लाख ५ हजार ३५५ रुपये (दुसरा टप्पा) व ६ लाख ३७ हजार ८४१ रुपये (तिसरा टप्पा) एवढी रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आली आहे. अल्पशा पावसात बंधाऱ्यांना गळती लागून माती वाहून गेली आहे. याबाबत प्रत्यक्ष बंधाऱ्याची पाहणी करावी. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

कृषी विभागाचा कानाडोळा 
जलयुक्‍त मोहिमेंतर्गत शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. तालुक्यातील अमळगाव, पातोंडा, जानवे, मारवड, मांडळ, मुडी, जवखेडा आदींसह विविध गावातील कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. ही सर्व जबाबदारी कृषी विभागाची असून, अधिकारी, कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. याबाबतही तहसीलदारांनी लक्ष घालून या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

कृषी सहाय्यकच बनले ठेकेदार 
अमळनेर येथील अनेक कृषी सहाय्यकांनीच तालुक्यातील जलयुक्‍तच्या कामांचे ठेके घेतल्याची शेतकऱ्यांमध्ये ओरड होत आहे. काही कृषीसहाय्यक बहाद्दरांनी तर नातेवाइकांच्याच नावाने ठेके घेऊन जेसीबी आदी मशीनरिचे बिल साटेलोटे करून लाटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. या कामांची पाहणी करून निकृष्ट कामांबाबत बिले रोखून संबंधितांना शासन व्हावे, अशी अपेक्षा तालुक्यातील जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amlner first rain jalyukt bandhara likage