#Saturday Motivation शिक्षिका बनू पाहणाऱ्या अश्‍विनीताई  कुक्कुटपालनामुळे बनल्या उद्योजक 

residentional photo
residentional photo

नाशिकः आयुष्याच्या वाटचालीत चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडून अनेक महिलांनी स्वतःला सिद्ध करतानाच इतरांसाठीही विकासाची वाट सुकर केली आहे. कपाळावरील रेषांऐवजी घामांच्या धारांत भविष्य शोधल्यास यश नक्कीच मिळते, हेच ब्रीद घेऊन यश मिळविणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे, शिक्षिका आणि तनिष्का भगिनी अश्‍विनी नीलेश साळुंके. 

बी.ए.,डी.एड.पर्यंत शिक्षण झालेल्या अश्‍विनीताईंचे माहेर चिंचवे-उमराणे (ता. मालेगाव), तर सासर लखमापूरचे (ता. बागलाण). वडील सुनील पवार यांना पत्नी, मुलगा व मुलगी असे चौकोनी कुटुंब सांभाळताना दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या परिसरात कोरडवाहू शेतीत राबून परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेमच. शेतीत पिकले तर कुटुंब चालणार, अशा कुटुंबात अश्‍विनीताई या घरातील ज्येष्ठ सदस्या. शेतीमधील चढउतार अनुभवायला येत असल्याने मुलीने शिकून नोकरी करावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मुळात अश्‍विनीताई अभ्यासात हुशार. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी पदवीनंतर डी.एड.चे शिक्षण घेऊन स्वत:ला अध्यापन कार्यात वाहून घेण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, त्यांना शिक्षक म्हणून आधीच वाट पाहत असलेल्या बेरोजगारांच्या रांगेत जाऊन बसावे लागलेले. 

जबाबदारी समर्थपणे सांभाळली
कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करत वडिलांनी अश्‍विनीताईंचा विवाह केला. त्यामुळे शिक्षिका बनण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. पती नीलेश साळुंके यांचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झालेले. स्वतःचा सायबर कॅफे सुरू करून ते कुटुंबाला पुढे नेत होते. दोन भावांचे कुटुंब, पण परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा वेळी नीलेश यांनी आपल्या धडपडीसोबतच पत्नी अश्‍विनी यांनाही प्रोत्साहन दिले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनीही कुटुंब सांभाळतानाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिद्द बाळगली अन्‌ 2014 मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार पतीकडे बोलून दाखवला. नीलेश यांनीही त्यांच्या विचारांना प्रोत्साहनच दिले. तातडीची मदत उपलब्ध करून देत बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन एक हजार कोंबड्यांचा फार्म सुरू केला. पहिल्या वर्षी फारसे यश मिळू शकले नाही. मात्र, त्यामुळे खचून न जाता अश्‍विनीताई अधिक जिद्दीने उभ्या राहिल्या. 

प्रगतीचा चढता आलेख 

मांसाहाराची मागणी लक्षात घेऊन या व्यवसायात अजून बदल करत अश्‍विनीताईंनी गावरान कोंबड्यांसोबतच कडकनाथ जातीच्या पिल्लांचे संगोपन केले. कोणत्याही हॅचरीजशी करार न करता स्वबळावर त्यांनी उभे राहण्याचा निर्णय घेतला. यातूनच कुक्कुटपालन व्यवसायात उभारी घेण्याची संधी चालून आली. कुक्कुटपालन हा शाश्‍वत व्यवसाय नाही, असे म्हणणाऱ्यांचे विधान खोटे ठरवत महिलाही यात मागे नाहीत, हेच त्यांनी प्रत्यक्ष जिद्दीतून दाखवून दिले. याच काळात शेतीपूरक व्यवसायांत कुक्कुटपालन व्यवसायात बसलेला जम नक्कीच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलाचा ठरू शकतो, हे त्यांच्या यशावरून सिद्ध झाले. 


मुलांनाही या व्यवसायात आणणार 
अश्‍विनीताईंसह पती नीलेश यांनीही या व्यवसायात स्वतःला झोकून दिले आहे. त्याचबरोबर पूरब आणि कार्तिक या मुलांनाही भविष्यात व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याबरोबरच याच व्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्या सांगतात. पती नीलेश यांच्या प्रोत्साहनामुळेच अश्‍विनीताईंनी आज लखमापूरसारख्या गावातच उत्तर महाराष्ट्रातील पहिले कडकनाथ कोंबडीचे जेवण देणारे हॉटेल सुरू केले आहे. 

दुष्काळावर मात 
निसर्गाच्या अनियमितपणावर अवलंबून न राहता अश्‍विनीताईंनी कोरडवाहू शेतीला कुक्कुटपालनाची जोड देत दुष्काळी परिस्थितीतही स्वतःला सिद्ध केले. त्यांचे हे कार्य इतरांसाठी आदर्श ठरत आहे. कुक्कुटपालन व्यवसायात आज अनेक कंपन्या संपूर्ण सामग्रीनिशी व्यवसाय उभे करण्याची संधी देत आहेत. त्याचा महिलांनी लाभ घेतल्यास आर्थिक पाया भक्कम होण्यास नक्कीच मदत होणार आहे. अशा संधींमुळेच दुष्काळावर मात करणे शक्‍य झाल्याचे अश्‍विनीताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 

भरपूर संधी 
कुक्कुटपालन हा शाश्‍वत उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने आर्थिक कोंडी कमी करण्यासोबतच कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळण्याचे साधन असल्याचे त्या सांगतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोरडवाहू शेतीचा विचार न करता कुक्कुटपालन व्यवसायात मिळालेल्या यशाने अश्‍विनीताईंना स्वत:ची ओळख दिली आहे. ग्रामीण भागातील बचतगटांची चळवळ पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी या व्यवसायाचा चांगला फायदा होऊ शकतो, या आत्मविश्‍वासावर अश्‍विनीताई ठाम आहेत. महिलांनी या शेतीपूरक व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

तनिष्का गटांना रोजगार अन्‌ मार्केट उपलब्ध करून देणार 

बाजारात सध्या गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना मोठी मागणी आहे. मात्र, पुरवठा खूपच कमी असल्याने अंड्यांच्या विक्रीतून महिलांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे अश्‍विनीताई सांगतात. अंड्यांच्या निर्मितीसाठी कोंबड्या पाळल्या तर या अंड्यांना स्वतः बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेण्याची तयारीही साळुंके दांपत्याने दर्शवली आहे. कुक्कुटपालन व्यवसायात कमी भांडवलात अधिक उत्पन्न मिळत असल्याने आणि बाराही महिने रोजगाराच्या संधी असल्याने महिलांनी या व्यवसायात यावे, असे आवाहन त्या करतात.

मोफत प्रशिक्षण देण्याची तयारी

"तनिष्का' सदस्यांना कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात मोफत प्रशिक्षण देण्याचीही त्यांची तयारी आहे. कुटुंबाचे पाठबळ असताना स्वतःला सिद्ध करताना "सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठाने दिलेले पाठबळ खूप मोठे असल्याचे नमूद करताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. "तनिष्का' व्यासपीठाने गेल्या तीन वर्षांत मला घडविताना दिलेला आत्मविश्‍वास नक्कीच मोलाचा असल्याचे त्या सांगतात. 
संपर्क ः अश्‍विनी साळुंके ः मो. 9545012235 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com