Video : काळ आला होता पण..! 

goods train
goods train

देसाईगंज (जि. गडचिरोली) : रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांच्या मधील जागेतून पलिकडील प्लॅटफार्मवर जाताना थांबलेली गाडी अचानक सुरू झाली अन्‌ संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून पुढे निघून गेली. सुदैवाने त्या युवकाला थोडी जखमही झाली नाही. हृदयाचे ठोके चुकविणारी ही घटना नुकतीच वडसा रेल्वेस्थानकावर घडली. या घटनेमुळे "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय आला. 

शॉर्टकटचा प्रयोग 

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफार्मवर जाण्यासाठी उड्‌डाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र, काही प्रवासी या उड्‌डाणपुलावरून न जाता शॉर्टकट मारीत रेल्वेरूळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर जातात किंवा प्लॅटफॉर्मवरून स्थानकाबाहेर पडतात. कधीकधी हा शॉर्टकट जीवावर सुद्धा बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील अनेक प्रवाशांनी अनुभवला. 

अन्‌ मालगाडी सुरू झाली 

गेल्या मंगळवारी (ता. 10) दुपारी येथील फलाट क्रमांक 1 वर गोंदियाला जाणारी पॅसेंजर, फलाट क्रमांक 2 वर गोंदिया- बल्लारशहा डेमो ट्रेन आणि तिसऱ्या फलाटावर मालगाडी उभी होती. गोंदिया पॅसेंजर पकडण्यासाठी तीन युवक फलाट क्रमांक 3 वर थांबलेल्या मालगाडीच्या दोन डब्यांच्या मधील जागेतून फलाट क्रमांक 1 वर जाण्यास निघाले. पैकी दोन तरुण रेल्वे डब्यांना जोडणाऱ्या कपलिंगवर उभे झाले तर तिसऱ्याने कपलिंगखालील मोकळ्या जागेतून रूळ पार करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच वेळी मालगाडी धावायला लागली. दोन डब्यांच्या कपलिंगवर उभे असलेल्या दोन युवकांनी तत्काळ फलाटावर उड्या मारल्या. मात्र, गाडीखालून जाणाऱ्या युवकाला रूळ ओलांडण्याची संधीच मिळाली नाही.

समयसूचकतेने वाचविले प्राण 

त्या युवकाने समयसूचकता दाखवत क्षणाचाही विलंब न लावता दोन रुळांच्या मध्ये समांतर झोपला. पाहता पाहता मालगाडीचे सर्व डबे त्याच्या अंगावरून धडधडत पुढे निघून गेले. तोपर्यंत स्थानकातील सर्वचजण श्‍वास रोखून हा थरारक प्रसंग प्रत्यक्ष बघत होते. मालगाडी निघून गेल्यानंतर तो युवक उठून उभा झाला, तेव्हा कुठे त्याच्या दोन मित्रांसह इतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. अख्खी मालगाडी अंगावरून गेल्यानंतरही त्या युवकाला थोडीशीही इजा झाली नव्हती. या प्रसंगाने भयभीत झालेला तो युवक व त्याचे मित्र नंतर रेल्वेस्थानकावरून पळून गेले. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. हा चित्तथरारक प्रसंग काही रेल्वेप्रवाशांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदसुद्धा केला होता.

उड्डाणपुलाचा वापर करा
रेल्वे फलाट ओलांडण्यासाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविले आहेत. मात्र, अनेक वेळा प्रवासी त्याचा वापर न करता धोका पत्करून रेल्वे रुळावरून पलिकडे जातात. परिणामी अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. रेल्वे रूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा आहे. प्रवाशांनी उड्डाण पुलावरूनच फलाट ओलांडावा, असे आवाहन देसाईगंजचे स्टेशनमास्टर संजयकुमार सिंग यांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे.
- संजयकुमार सिंग,
स्टेशनमास्टर, देसाईगंज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com