BATTLE FOR DHULE-बालेकिल्ल्यातील कॉंग्रेसचे मताधिक्‍य भाजपसाठी चिंतेचे 

प्रमोद सावंत,मालेगाव
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. अल्पसंख्याकबहुल मतदारसंघ असल्याने भाजपविरोधाची धार तीव्र आहे. ही आग सतत तेवत ठेवण्याची रणनीती कॉंग्रेसने साधली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गेल्या वेळी कॉंग्रेस उमेदवाराला मिळालेल्या सव्वा लाखाच्या मताधिक्‍यात भर घालण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. याउलट या भक्कम तटबंदीला थोडाफार सुरुंग लावण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. येथील हमखास आघाडीच्या जोरावर कॉंग्रेसच्या आशा पल्लवित आहेत. या बालेकिल्ल्यातील कॉंग्रेसची आघाडी भाजपसाठी डोकेदुखी ठरेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्ष कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार का? या पक्षाची भूमिका याबाबत उत्सुकता आहे. येथील एकगठ्ठा मतांवरच दिल्ली सर करण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. याउलट हॅट्ट्रिक केल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा संसदेत पाठविण्याचे आव्हान भाजपला आहे. 

मोजकेचे कार्यकर्ते 

महापालिकेवर कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. नगरसेवकांचा जनसंपर्क उमेदवारासाठी लाभदायी आहे. येथून सातत्याने कॉंग्रेसला आघाडी मिळाली. माजी विरोधी पक्षनेते (कै.) निहाल अहमद यांनी पंधरा वर्षांपूर्वी निवडणूक लढवीत अल्पसंख्याक मतांच्या विभाजनास हातभार लावला. त्या वेळी प्रतापदादा सोनवणे विजयी झाले. पाठोपाठ सलग दोनदा बाजी मारून लोकसभा निवडणुकीत भाजपने हॅट्ट्रिक साधली. त्यानंतर "एक ही भूल कमल का फूल' या प्रचाराने गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेस उमेदवाराला भरभरून मते मिळाली. मात्र जातीचे गणित व अन्य विधानसभा मतदारसंघातून साथ न मिळाल्याने कॉंग्रेस व जनता दलाचा हा बालेकिल्ला ढासळला. त्या तुलनेत मालेगाव मध्य मतदारसंघात भाजपचे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते आहेत. त्यांचा फारसा प्रभाव नाही. महापालिका निवडणुकीत पूर्व भागात 25 पेक्षा अधिक जागांवर भाजपने उमेदवार रिंगणात उतरवूनही एकही जागा मिळाली नाही. एकलाख नागा, शेख इब्राहिम, मंडल अध्यक्ष जाबीर खान साबीर, समद शेख आदी मोजके कार्यकर्ते भाजपच्या प्रचारातून डॉ. सुभाष भामरे यांना किती रसद पुरवतील याविषयी साशंकता आहे. 

कॉंग्रेसच्या सभेला जोरदार प्रतिसाद 

कॉंग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवारची संधी साधून फतेह मैदानात जाहीर सभा घेतली. सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. महापौर रशीद शेख, आमदार आसिफ शेख व नगरसेवकांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. विक्रमी मताधिक्‍य मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला धडा शिकविण्याची नामी संधी आल्याची भावना मुस्लिम मतदारांमध्ये आहे. उमेदवार जाहीर करण्यात आघाडीवरील वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलाचा निर्णय घेतला. नवीन नावावर मात्र शिक्कामोर्तब झाले नाही. वंचित आघाडीचे कमाल हाशिम यांना समाजवादी पक्ष बसपतर्फे उमेदवारी जाहीर झाली. कमाल हाशिम किती मते मिळविणार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची व एमआयएमची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरेल. वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पक्षाच्या उमेदवारांमुळे मुस्लिम मतांचे विभाजन होईल, ही एकमेव आशा भाजप बाळगून आहे. हे दोन उमेदवार किती मतांची बेगमी मिळविणार याची कोणीही खात्री देत नाही. गेल्या वेळी "आप'तर्फे निहाल अन्सारी हे शिक्षणसम्राट निवडणुकीत असतानाही त्यांना दहा हजारांचा पल्ला गाठता आला नव्हता. मौलाना मुफ्तींचे मन वळविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसतर्फे सुरू आहे. 

भामरेंना अवघी पाच हजार मते 
कॉंग्रेसच्या बालेकिल्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरिशभाई पटेल यांना मालेगाव मध्यमधून एक लाख 33 हजार 124 मते मिळाली होती, तर डॉ. सुभाष भामरे यांना अवघी पाच हजार 786 मते मिळाली होती. 786 हा आकडा मुस्लिम धर्मीयांमध्ये अतिशय शुभ मानला जातो. अन्य पाचही विधानसभा मतदारसंघांतून डॉ. भामरे यांना मिळालेले मताधिक्‍य हा शुभसंकेत सार्थ ठरवून गेला. भाजपची हॅट्ट्रिक झाल्यानंतर हा मतदारसंघ हिरावून घेण्याचा कॉंग्रेसने चंग बांधला असताना मतदारसंघ राखण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 
 

Web Title: marathi news BATTALE FOR DHULE