जिद्द-पार्लरने दिला योगिताताईंच्या जगण्याला आधार 

residentional photo
residentional photo

 नाशिक-आयुष्यातील जगण्याच्या लढाईत संकटे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली मर्यादा कळत नाही. मात्र संकटांची ही मालिका खंडित करायची असेल तर स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे. या विचारांतून स्वतःला सिद्ध करत योगिताताईंनी इतरांसाठीही आदर्श निर्माण केलाय. पेठसारख्या आदिवासी भागातील बाळकडू पुढे नेत त्यांनी कुटुंबाला दिलेला आधार नक्कीच मोलाचा आहे. 

      योगिता संजय काळे, शिक्षण बारावी, माहेर पेठ येथील, तर सासर नाशिकच्या चौक मंडईत. आनंदा नथू सोनवणे यांचे पत्नी हिराबाई आणि चार मुलींचे कुटुंब. स्वतःचा ट्रक चालवत कुटुंबाला पुढे नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. योगिताताई पाच वर्षांच्या असतानाच वडिलांचे छत्र हरपले. वडिलांचा वसा पुढे नेण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या आईने कॉस्मेटिकचे दुकान पेठ येथे सुरू केले. योगिताताई यांचे बारावीत असतानाच लग्न झाल्याने शिक्षण अर्ध्यावरच सुटले. पती संजय काळे यांचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण असल्याने त्यांनी छोटे इलेक्‍ट्रिकल्सचे दुकान सुरू केले होते.

आर्थिक जुळवाजुळव मोठी

 व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे अनेकदा आर्थिक जुळवाजुळव करणे कुटुंबाला जिकिरीचे होत होते. कुटुंबात सासू-सासरे आणि अन्य सदस्यांसह मोठे कुटुंब होते. कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी योगिताताई यांचीही धडपड सुरू होती. यासाठी त्यांना ब्यूटिपार्लरचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करण्याबाबत त्यांनी पती अशोक यांना इच्छा बोलून दाखविली. 

    अशोक काळे यांनी पत्नीला प्रोत्साहन दिले. मात्र आर्थिक कोंडमारा असल्याने प्रशिक्षण कसे घ्यायचे, हा प्रश्‍न दोघांसमोर होता. अशाही परिस्थितीत योगिताताईंनी घरगुती मसाले तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र यातून मिळणारा परतावा तुटपुंजा होता. चार वर्षे योगिताताईंनी पती अशोक यांच्या प्रोत्साहनातून हा व्यवसाय सुरू ठेवत यातून मिळालेल्या पैशांतून ब्यूटिपार्लरचे प्रशिक्षण पूर्ण केले. 

घरातूनच व्यवसायाला सुरवात

प्रारंभी भांडवल नाही, मात्र घरातच ब्यूटिपार्लरचा व्यवसाय सुरू केला. याच काळात मुले आदित्य आणि प्राजक्ता यांच्यानिमित्ताने कुटुंबातील सदस्यसंख्या वाढली. मात्र स्वबळावर यश खेचून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पहिल्या दिवसाची कमाई होती फक्त 40 रुपये... मात्र हेच 40 रुपये योगिताताईंचा आत्मविश्‍वास उंचावण्यासाठी मोलाचे ठरले. या व्यवसायात स्थिर होण्यासाठी मिळालेले बळ पुढे नेत त्यांनी मेहनतीने यश खेचून आणण्यास सुरवात केली. 

संकटांची मालिका 
स्वतःचा ब्यूटिपार्लरचा व्यवसाय पुढे नेत असतानाच आयुष्यातील चढ-उतारात अनेक संकटांनी कुटुंबाला ग्रासले. याच काळात बहीण स्वाती यांना ब्रेनट्यूमर झाला होता. मात्र आईची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने बहिणीच्या औषधोपचारासाठी खर्च करूनही उपयोग झाला नाही. बहिणीचे अकाली निधन झाले. याच काळात आई हिराबाई यांच्याही आजारपणाने डोके वर काढले. आईचा खुबा मोडल्याने अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची सर्व बहिणींनी सेवा केली. मात्र यातच आईचे निधन झाले. 

समाजासमोर ठेवला आदर्श 
सोनवणे कुटुंबात मुलगा नसल्याने आई हिराबाई यांच्या पार्थिवाला योगिताताईंनीच अग्निडाग देत सर्व सोपस्कार स्वतः केले. घटना होती 2012 मधली. या काळात मुलीने दिलेल्या अग्निडागामुळे समाजपरिवर्तनाची एक नवी दिशाच मिळाल्याने सर्वांनी कौतुक करण्याबरोबरच नवा आदर्श निर्माण केल्याने प्रसारमाध्यमांसह इतरांनीही दखल घेतली. योगिताताई खंबीर होत कुटुंबाला आधार देत दुःखातून बाहेर पडल्या.

मात करत पुढे प्रवास

मुलगा आदित्य आणि प्राजक्ता यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवत त्यांना काहीही कमी पडणार नाही, याकडे विशेष लक्ष पुरवले. मुलगी प्राजक्ताने पदवीचे प्रशिक्षण घेतले असून, त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्या या प्रवासात जावई विनीत निखाडे यांचेही सहकार्य मिळतेय. मुलगा विनीत इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असून, त्याने स्वतःच्या व्यवसायातून गरजूंना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशीही योगिताताईंची अपेक्षा आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आज योगिताताई काळे यांनी स्वतःची ओळख निर्माण करत या व्यवसायाच्या माध्यमातून परिस्थितीवर मात करत खेचून आणलेले यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. 
ब्यूटिपार्लरमध्ये योगिताताईंनी स्वतःला सिद्ध करत प्रामाणिक सेवा आणि जनसंपर्काच्या जोरावर नावलौकिक मिळविला.

कुटूंबाला मिळाली भक्कम साथ

आर्थिक परिस्थिती भक्कम करतानाच आता त्यांची कुटुंबालाही साथ मिळू लागली. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांमुळे जगायला शिकलेल्या योगिताताईंनी गरजू मुलींनाही मोफत शिकविण्यासाठी पुढाकार घेतला. याच काळात पुन्हा आजारपणाने डोके वर काढत पतीलाही आजाराने ग्रासले. मात्र ब्रेन हॅमरेजसारख्या जीवघेण्या आजारातून पती अशोक यांनाही बाहेर काढत जगणे सुंदर केलेय. आयुष्यात आलेल्या संकटांमध्ये खचून न जाता प्रत्येकाने कुटुंबातील एक घटक म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे. परिस्थिती कशीही असली तरी त्यातून मार्ग निघतोच, या वाक्‍यावर ठाम राहत महिलांनी नेहमीच प्रयत्नवादी असावे, हे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. 


तनिष्का व्यासपीठ सदस्यांना मोफत प्रशिक्षण 
"सकाळ' माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठामार्फत गरजू, गरीब महिलांना मोफत प्रशिक्षण देत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी योगिताताई प्रयत्नशील आहेत. व्यासपीठाने सुचविलेल्या महिला अथवा युवतींना नेहमीच मोफत प्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच तत्पर राहीन, असे त्या सांगतात. 
संपर्क ः योगिता काळे, मो. 8668412671 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com