अखेर विद्यार्थी ५३८ विद्यार्थी परतले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

दिल्लीत ‘लॉकडाउन’मध्ये फसलेल्या ‘यूपीएससी’च्या एक हजार ३३८ विद्यार्थ्यांना घेऊन येणारी रेल्वे आज दुपारी दीडला येथील स्थानकावर पोहोचली. यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या ५३८ विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी येथील स्थानकावर उतरविण्यात आले.

भुसावळ : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली येथे गेलेले विद्यार्थी ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले होते. केंद्र शासनाने अडकलेल्यांची वैद्यकीय तपासणी करुन आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली. तसेच रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्या चालविल्या असून, दिल्ली येथून ५३८ विद्यार्थी येथे उतरले. 

दिल्लीत ‘लॉकडाउन’मध्ये फसलेल्या ‘यूपीएससी’च्या एक हजार ३३८ विद्यार्थ्यांना घेऊन येणारी रेल्वे आज दुपारी दीडला येथील स्थानकावर पोहोचली. यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या ५३८ विद्यार्थ्यांना पुढील प्रवासासाठी येथील स्थानकावर उतरविण्यात आले. यानंतर त्यांच्यासाठी परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून २५ बस सोडण्यात आल्या. या बसमधून विद्यार्थ्यांना आपापल्या गावी सोडण्यात आले. तसेच नाशिक, कल्याण, पुणे येथे पुढील प्रवास करणाऱ्यांसाठी येथील स्थानकावर जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेस्थानकावर आरपीएफ कमांडंट क्षितिज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, आरपीएफ निरीक्षक दयानंद यादव, सहाय्यक निरीक्षक कौल, आरपीएफ योगेश घुले, दीपक शिरसाठ, आर. के. यादव, ललित टोके आदी उपस्थित होते. 
 
दिल्ली- पुणे रेल्वे 
दिल्ली येथून रवाना झालेली ही रेल्वे मार्गात मध्य प्रदेशातील भोपाळ, इटारसी येथे, तर महाराष्ट्रात भुसावळ, नाशिक व कल्याण येथे थांबून पुण्याकडे रवाना होणार आहे. येथील स्थानकावर विद्यार्थ्यांना उतरवून पिण्यासाठी थंड पाणी आणि फळांचा ज्यूस देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना स्थानकाबाहेर सोडण्यात येऊन बसने आपापल्या शहराकडे रवाना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal 538 student coming delhi pune special railway