हॉटेल व्यवसायीक बनला आंबा विक्रेता 

श्रीकांत जोशी
शनिवार, 23 मे 2020

रस्त्याने जाणाऱ्यांना येणारा शेवभाजीच्या वासाचा दरवळ युवराजशेठचे हॉटेल असल्याची आठवण करुन देतात. सकाळी दहा वाजता बाजार करणे दुपारी दोन वाजता हॉटेलमधील कामाचे नियोजन करुन चार वाजेपर्यंत जेवण तयार करणे.

भुसावळ : कोरोना लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. पण येथील हॉटेल व्यवसायीक युवराज अंबोले ऊर्फ युवराजशेठ यांनी चक्क रस्त्याच्या कडेला बसून आंबे विकणे सुरू केले आहे. त्यांच्या या व्यवसाय बदलाचे अनेकांकडून कौतुक होत आहे. 

अंबोले यांचे यावल रोडवर साधे पत्र्याचे हॉटेल आहे. तेथील शेवभाजी, मटण व मासे विशेष प्रसिद्ध आहेत. सायंकाळ झाली की, खवय्ये गर्दी करु लागतात. हॉटेलच्या बाहेर लागलेल्या दुचाकीच्या रांगा व रस्त्याने जाणाऱ्यांना येणारा शेवभाजीच्या वासाचा दरवळ युवराजशेठचे हॉटेल असल्याची आठवण करुन देतात. सकाळी दहा वाजता बाजार करणे दुपारी दोन वाजता हॉटेलमधील कामाचे नियोजन करुन चार वाजेपर्यंत जेवण तयार करणे. त्यानंतर रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करुन घरी जाणे अशी त्यांची दैनंदिनी होती. गेल्या वीस वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. निवडणूक काळात कार्यकर्त्यांच्या जेवणाची जबाबदारी काही राजकीय पुढारी त्यांच्यावरच सोपवितात. लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय बंद झाला. अंबोले म्हणतात, सुरवातीला काही दिवस घरी आराम केला. हॉटेलमध्ये नऊ माणसे कामाला होती. त्यातील काही जणांना पैसे देऊन घरी पाठवून दिले. मात्र, हॉटेलच्या संरक्षणासाठी तीन माणसे आहेत. त्यांच्या जेवणाचा खर्च करावा लागतो. चार जणांचे घर चालवतांनाही आर्थिक ताणाताण व्हायला लागली. तेव्हा फळ विकण्याचा विचार आला. आता सकाळी पहाटे जाऊन फळे घेतो. आल्यावर वेगवेगळ्या भागात छोटेसे दुकान थाटतो. दुपारी एक वाजेपर्यंत विक्री करतो. उन तापायला लागले की घरी जातो. लोकांचे फोन आले की होम डिलिव्हरी करीत असल्याचे अंबोले सांगतात. 
 
हॉटेलचे ग्राहक येतात ते म्हणतात काय युवराजशेठ आंबे विकतात. मी त्यांना म्हणतो चुकीचे काम करण्यापेक्षा आंबे विकलेले काय वाईट. शेवटी कोणत्याही कामाची लाज वाटन देऊ नये. पोटाची खळगी चांगल्या मार्गाने भरता येते हे मुलांनाही यातुन शिकायला मिळते. 
- युवराज अंबोले, फळविक्रेता भुसावळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal hotel close and mango sale lockdown