निराधार मुलीला आधार देऊन मातेचीही उजळली कुस borole

live photo
live photo

भुसावळ ः कुटुंबाचा वारसा पुढे चालत रहावा यासाठी मुलगाच हवा अशी सर्व सामान्‍य अपेक्षा असते. ज्यांना मुलबाळ नसत अशा व्यक्ती शक्यतोवर दत्तकविधी करुन मुलगा दत्तक घेतात. भुसावळ येथील एक दाम्पत्य मात्र या विधानाला अपवाद ठरलं आहे. या कुटुंबाने मुलगा नव्हे तर मुलगी दत्तक घेऊन मुलगी देखील कुटुंबाचा आधार ठरु शकते हे सिद्ध करुन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. या सोहळ्याने ऐका निराधार मुलीला आधार मिळाला तर एका मातेची कुस उजळली आहे. 

भुसावळ येथील प्रशांत प्रकाश बोरोले व त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णा बोरोले हे दाम्पत्य खाजगी सेवेत आहेत. अठरा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना अपत्य नव्हते. एखादं बाळ आपण दत्तक घेऊ या असा विचार या दोघांच्या मनात आला. व तसे नातेवाईक व मित्र मंडळीत त्यांनी बोलून दाखविले. आठ दहा महिन्‍यात ही चर्चा फळाला येईल असे वाटू लागले. यावल येथील चौधरी कुटुंब त्यांच्या संपर्कात आले. तुषार चौधरी हे चंदीगडला सेवेत होते. दरम्यान ते आजारी पडले व यावल या मुळगावी आई वडिलांकडे आले. औषधोपचार सुरू असताना अचानक त्यांचे निधन झाले. मुलीचे पितृछत्र अचानक हरपले. काही काळ लोटला, या बालिकेच्या आईनेही भुसावळ येथे सर्व संमतीने दुसरा विवाह केला व नव्या सासरी नांदवयास गेली. 

एव्हाना तेजल चौधरी ही आठ वर्षाची झाली. वडील नाही, आई सोबत नाही हे दुःख कमी की काय, दैवाने दुसरा आघात केला. आजोबा अशोक चौधरी देखील वारले. वृद्ध आजी व तेजल एकाकी पडले. दरम्यान प्रशांत बोरोले यांचा निरोप मिळाला. भेटी झाल्या, यातून तेजलला दत्तक घेतो असे ठरले. नियमानुसार दत्तकविधी झाला. तेजल यावल सोडून भुसावळला तु. स. झोपे विद्यालयात चौथीत दाखल झाली. 
गेल्या आठवड्यात बोरोले परिवाराने देवाब्राह्मणाच्या साक्षीने आणखी ऐक विधी करुन पाचशे नातेवाईक व मित्र मंडळी सोबत वरण पोळी वांग्याची भाजी व शिरा असा खानदेशी मेनू करुन कौटुंबिक सोहळा द्विगुणित केला. अनेक मान्‍यवरांनी उपस्थिती दिली. स्वर्गीय आईची इच्छा मुलगीच दत्तक घे अशी होती ती ही पूर्ण झाली असे प्रशांत बोरोले यांनी सांगितले. लेवा समाजातही हा एक आदर्श असून एका निराधार मुलीला आधार मिळाला व मातेचीही कुस उजळली म्हणून महिला वर्गाने एकमेकींना हळद कुंकू लावून जेवताना पाठीवर पापड फोडून पारंपरिक पद्धतीने आनंद व्यक्त केला. यावेळी तेजलच्या चेहऱ्यावरील तेज आणखीनच ऊजळले होते. संपूर्ण मांडवभर ती आलेल्यांच्या पाया पडून आशीर्वाद स्वीकारत होती. 
 
बोरोले दाम्पत्यान बाळ व्हावे यासाठी सर्व उपाययोजना केल्या. मुंबई, पुणेसह अनेक ठिकाणी उपचार केले. मात्र यश आले नाही. डॉक्टरांनी टेस्टट्युब बेबी, सरोगसी मदर असे पर्याय सुचविले. परंतु यातही लाखो रुपये खर्च व यशाचा हमी नसल्याने दत्तक मुलगी घेऊन हे पैसे तिच्याच लालन पालनावर खर्च करु असे प्रशांत व सुवर्णा यांनी ठरविले व बेत तडीस नेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com