भुसावळला रेल्वे लोको शेडमध्ये ‘इन हाऊस निर्जंतुकीकरण’ मशिनची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

रेल्वेच्या इतर विभागांना देखील येथूनच मशिनची निर्मिती करुन दिली जाणार आहे. यातून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीस ३ सेकंदात पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जाते.

भुसावळ : ‘कोविड १९’ ला लढा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये इन हाऊस निर्जंतुकीकरण मशिन तयार करण्यात आली. यासाठी केवळ १५ हजार रुपये खर्च आला असून, याची दखल घेत आता रेल्वेच्या इतर विभागांना देखील येथूनच मशिनची निर्मिती करुन दिली जाणार आहे. यातून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीस ३ सेकंदात पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले जाते.

क्‍लिक करा - आदिवासींची जीवनशैली हटविणार कोरोना 

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीतही रेल्वेच्या काही विभागांचे कामकाज सुरु आहे. त्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता आणि वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरएस) हिमांशु रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभाग अभियंता मुकेश चौधरी यांच्या देखरेखीखाली मशिन तयार करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण मशिन बनविण्यात आली असून, या मशिनची रचना एमएस पाईप्सद्वारे बनविली आहे. ज्यामध्ये तिरपाल पत्रके असतात. सोल्यूशनची फवारणी करण्यासाठी पीव्हीसी पाइपिंग आणि स्प्रे नोजल दिले आहेत. बोगद्याचा आकार दीडशे बाय दीडशे बाय २२० सेंटीमिटर आहे. बोगद्याच्या आत तीन ते पाच सेकंदाच्या कालावधीत फिरत असताना तीन नोजलचा संच फवारला जाईल. पृष्ठभागावर संपर्क साधल्यानंतर, ते विषाणू नष्ट करण्यास पुरेसे कार्यक्षम आहे. ५०० लिटर क्षमतेचा निर्जंतुकीकरण बोगदा १६ तास अखंडपणे कार्य करेल, म्हणून दिवसातून एकदाच पुन्हा भरणे आवश्यक आहे. ऊर्जा आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी दोन्हीकडून स्विच दिला आहे. जेणेकरून प्रवेशाच्या वेळी कर्मचारी स्प्रे चालू करुन बाहेर पडू शकेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal railway loco shed sterilization machine corona virus