Video : भुसावळला कोरोनामुक्त रुग्णांचे फुले उधळून स्वागत; दोन डॉक्टरही कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

गेल्या काही दिवसांपासून भुसावळ मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यात काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे भुसावळकर तणावात होते. काल (ता. १०) रात्री सुमारे पाच जण कोरोना मुक्त झाल्याची बातमी आली व सगळ्यांना आनंद झाला.

भुसावळ : येथील कोरोनामुक्त झालेले सात रुग्ण काल (ता. १०) रात्री घरी परत आले. तेव्हा परिसरातील रहिवाशांनी फुले उधळत व टाळल्या वाजवत त्यांचे स्वागत केले. यात दोन डॉक्टरांचाही समावेश होता. ही सुखद वार्ता कळताच भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला. 

 

गेल्या काही दिवसांपासून भुसावळ मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यात काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे भुसावळकर तणावात होते. काल (ता. १०) रात्री सुमारे पाच जण कोरोना मुक्त झाल्याची बातमी आली व सगळ्यांना आनंद झाला. शांतीनगर भागातील डॉक्टर पत्नी व मोठ्या मुलांसह रात्री पावणे दहाच्या सुमारास परत आले. त्यावेळी अपार्टमेंट मधिल व परीसरातील नागरीकांनी फुले उधळत व टाळ्या वाजवत स्वागत केले. यावेळी डॉक्टरांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक अमोल इंगळे उपस्थित होते. तसेच महेश नगर भागातील डॉक्टरांचे व संत कवरराम चौक (सिंधी कॉलनी) भागातील एका कर्मचाऱ्याचे पेपर बॉम्ब फोडून, डमरु वाजवून व फुले उधळून सर्वात करण्यात आले. यावेळी नगरसेवक निक्की बतरा उपस्थित होते. 

आवर्जून वाचा - बाळंतीन पत्नी, मुलांसह सायकलवरुन १४०० किलो मीटरची वाटचाल  

सात दिवसांसाठी क्वारंटाइन 
शहरात २५ एप्रिलला समता नगरात पहिली महिला रुग्ण आढळून आली होती. त्यानंतर २८ एप्रिलला सिंधी कॉलनीतील पालिका कर्मचारी व डॉक्टरदेखील बाधीत झाले होते. या पाठोपाठ ३० एप्रिलला शांती नगरातील डॉक्टरांची पत्नी व त्यांचा मुलगा असे तीन रुग्ण बाधीत झाले होते. यांच्यासह अन्य एक, असेच सात रुग्णांवर इतर रुग्णांप्रमाणेच जळगावात उपचार सुर होते. नवीन निर्देशांप्रमाणे त्यांची उपचाराची प्रक्रिया पूर्ण झाली. या दरम्यान त्यांना लक्षणे किंवा काही त्रास नसल्याने काल (ता.१०) डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णवाहिकेने रात्री त्यांना आपापल्या घरापर्यंत सोडण्यात आले. या सर्व रुग्णांना सात दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना सात दिवसांची औषधे सोबत देण्यात आली आहेत. या रुग्णांना घराबाहेर निघण्यास निर्बंध असतील. यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचे नियमित वेळापत्रक पाळावे, असेही निर्देश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal two docter corona relief and discharge hospital