Loksabha 2019 : दोन्ही उमेदवारांची होमग्राउंडवर कसोटी 

आनन शिंपी
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. देवकर हे दोन महिन्यांपासून आखाड्यात उतरून तयारी करीत आहेत; तर आमदार उन्मेष पाटलांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. मात्र, ते सत्ताधारी आमदार असल्याने त्यांचे नेटवर्क नेटाने प्रचारात उतरले आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. देवकर हे दोन महिन्यांपासून आखाड्यात उतरून तयारी करीत आहेत; तर आमदार उन्मेष पाटलांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. मात्र, ते सत्ताधारी आमदार असल्याने त्यांचे नेटवर्क नेटाने प्रचारात उतरले आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे आमदार उन्मेष पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस तालुक्‍यात एकसंध दिसत असली, तरी भाजपमध्ये तशी स्थिती नाही. एकीकडे उन्मेष पाटलांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साह आहे, तर दुसरीकडे तिकीट कापलेले ए. टी. पाटील यांचे समर्थक अजूनही नाराज दिसत आहेत. 

यापूर्वी पालकमंत्री म्हणून राहिलेल्या देवकरांचा संपूर्ण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय त्यांचे नाव पक्षातर्फे उमेदवार म्हणून निश्‍चित झाल्यानंतर इतर इच्छुकांनीही त्याला संमती देऊन त्यांच्यासोबत प्रचारात सहभाग घेतला आहे. पालकमंत्री असताना देवकरांनी तालुक्‍यातील जी काही विकासकामे मार्गी लावली, ती मतदारांसमोर असल्याने हा मुद्दा राष्ट्रवादीच्या प्रचारात प्राधान्याने मांडला जात आहे. देवकरांच्या प्रचाराची सर्व धुरा तालुक्‍याचे माजी आमदार राजीव देशमुख व त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या सांभाळल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्‍यातून लोकसभा निवडणुकीत मिळणारे मताधिक्‍य आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देवकरांच्या विजयासाठी झटून कामाला लागले आहेत. आजच चाळीसगावला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवक मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे. गावागावातील होणाऱ्या छोट्या छोट्या सभा, सोशल मीडियावरून केले जाणारे आवाहन, वाहनांवर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून होणारा प्रचार, तालुक्‍यातील रखडलेली विकासकामे करण्याची देवकरांकडून दिली जाणारी ग्वाही, भाजपच्या काही नाराजांकडून मिळणारा छुपा पाठिंबा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. 

आमदारांचा प्रचार युद्धपातळीवर 
भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांचे सुरवातीला खासदारकीच्या उमेदवारासाठी नाव घेतले गेले. मात्र, स्वतः उन्मेष पाटील त्याचा इन्कार करीत होते. अखेर त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार करता त्यांना तुलनेने प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. मात्र, अशातही त्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचाराचे युद्धपातळीवर नियोजन केल्याचे दिसत आहे. दररोज साधारणतः बारा ते पंधरा गावांमध्ये ते जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. चाळीसगावचेच आमदार असल्याने त्यांनी इतर तालुक्‍यांवर प्रचाराच्या दृष्टीने "फोकस' केला आहे. भाजप- शिवसेना युती असली, तरी गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. अगदी निवडणुकीच्या तोंडावर तर भाजपचा प्रचारच करणार नाही, असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, पक्षाचा आदेश असल्याने व शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे आमदार उन्मेष पाटलांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे सरळसरळ दोन गट असून, एक गट अजूनही प्रचारात पाहिजे त्या प्रमाणात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. तथापि, आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन करून मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. चाळीसगाव शहरात त्यांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे देखील प्रचारात सक्रिय झाले आहेत. आजच भडगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये चैतन्य आणले. आमदार म्हणून जी काही विकासकामे करून भरीव निधी तालुक्‍यात आणला, तशी कामे व निधी जळगाव लोकसभा मतदारसंघात आणू, अशी ग्वाही आमदार पाटील व त्यांचे कार्यकर्ते प्रचारात देत आहेत. प्रचार यंत्रणेत विशेषतः मोठ्या शहरांमध्ये बलून, "एलईडी व्हॅन' डॉक्‍युमेंटरी, प्रचाराची गाणी, सोशल मीडिया आदींचा वापर आमदार पाटलांच्या प्रचारात होत आहे. चाळीसगाव नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती यासारख्या संस्थांवर आमदार उन्मेष पाटील यांच्या गटाची सत्ता असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news candidate homegraund test