चाळीसगावातील तीनशे घरांचे सर्व्हेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

सर्दी, खोकला यासह अन्य कुठल्याही आजारांची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात येऊन उपचार करून घ्यावेत. कोरानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा सतर्कपणे काम करीत आहे. 
- डॉ. बी. पी. बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव 

 

चाळीसगाव : मालेगाव येथे कोरोनाबाधीत नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्यांना सध्या ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. यातील सहा जणांना जळगावला हलविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणखीन सतर्क झाले आहे. त्यानुसार, आवश्‍यक त्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. कालपर्यंत (१० एप्रिल) शहरातील सुमारे ३०० घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

नक्‍की पहा - शेतकऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून कर्ज प्रक्रिया : कृषिमंत्री दादा भूसे 

चाळीसगाव अद्यापपर्यंत कोरानाची बाधा झालेला रुग्ण आढळून आलेला नसला तरी कोरोनाबाधीताच्या अंत्ययात्रेला मालेगाव येथील जाऊन आलेले सहा जण नुकतेच मिळून आले. त्यांच्या तपासणीचा अहवाल चार दिवसांनी प्रशासनाला प्राप्त होणार आहे. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे कुटुंब राहत असलेल्या संपूर्ण भागाचे पालिकेतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालय व राष्ट्रीय मनुष्य आरोग्य मिशनतर्फे शहरात आवश्यक त्या वॉर्डात घरांचे आशा स्वयंसेविका व परिचारिका मिळून २० कर्मचाऱ्यांतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले असून कालपर्यंत ३०० घरांचे सर्व्हेक्षण झाले होते. नागरिकांना सर्दी, खोकला किंवा इतर कोणत्याही आजाराची लक्षणे आढळली तर तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

भाजीपाला, भुसार मार्केट बंद 
कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, येथील भाजीपाला व भुसार मार्केट कालपासून (१० एप्रिल) बेमुदत बंद करण्यात आले आहे. यामुळे सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची गैरसोय झाली. शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाल्याची काहींनी किरकोळ विक्री केली तर काहींना नाइलाजास्तव काही माल परत घरी घेऊन जावा लागला. 
 
 
कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून जनजागृतीचे काम केले जात आहे. नागरिकांनी घरातच राहून ‘लॉकडाऊन’चे पालन करावे. विशेषतः तरुणांनी विनाकारण दुचाकीवर फिरु नये. नागरिकांनी या काळात स्वतःची काळजी घेऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. 
- विजयकुमार ठाकूरवाड, शहर पोलीस निरीक्षक, चाळीसगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon 300 house Survey corona virus