शेतीत टाकलेला पैसा भी निघना...घरातच माल पडलाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

घरात कापूस पडून असल्याने अंग खाजरेपणाची लागण सुरु झाली आहे.लहान मुले व वृद्धांना सांभाळतांना मोठी कसरत करावी लागत आहे. आणखी जास्त दिवस कापूस घरात पडून राहीला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसून त्यांचे कंबरडे मोडणार आहे. 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- कोरोना व्हायरसमुळे आज जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले असतांना शेती आणि शेतकरी यांना चांगलाच फटका बसत आहे.चाळीसगाव तालुक्यात अद्यापही शेतकऱ्यांकडे घरात कापूस पडून आहे. लॉकडाऊनमुळे कापूस खरेदी थंडावली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुसरीकडे घरात कापूस पडून असल्याने अंग खाजरेपणाची लागण सुरु झाली आहे.लहान मुले व वृद्धांना सांभाळतांना मोठी कसरत करावी लागत आहे. आणखी जास्त दिवस कापूस घरात पडून राहीला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसून त्यांचे कंबरडे मोडणार आहे. 

चाळीसगाव तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. गेल्या तीन चार वर्षापासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला मात्र शेवट्च्या टप्प्यात अति पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. उत्पादन निम्म्याने घटले. या स्थितीतही शेतकऱ्यांना हाती आलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने तो घरात साठवून ठेवला.काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात कापूस विकुन मोकळे झाले. तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करत कष्टाने कापसाचें पीक घेतलं आहे.

 मोबदला आलेला नाही
ज्या शेतकऱ्यांनी कापूस  शासकीय खरेदी केंद्राद्वारे विकला. हा कापूस विकल्यानंतर हातात चांगले पैसे येतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्याच्या हातात आतापर्यंत आद्यापही मोबदला आलेला नाहीे. हा मोबदला शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा होणार होता. अपुऱ्या मनुष्यबळा अभावी पैसे खात्यात जमा करण्यास विलंब होत आहे.देशभरात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना इतर दिवसांप्रमाणे आपली कामे करता येत नाही.जवळपास दीड महिना झाला तरी बऱ्याच शेतकऱ्यांना कापसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हाताश झाला आहे. लॉकडाऊनमुळे घरातच कापूस पडून असल्याने उत्पन्नाचे मार्ग कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
 
आजाराची लागण....
लॉकडाउनच्या काळात काही शेतकऱ्यांकडे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही आता पैसे उरलेले नाहीत.अडचण दूर करण्यासाठी सरकारने कापसाची खरेदी तात्काळ सुरु करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवल्याने आजाराची लागण होत आहे.एकीकडे लॉकडाऊनमुळे घरातुन बाहेर पडता येत नाही अशी स्थिती असतांना दुसरीकडे घरात जास्त काळ ठेवलेल्या कापसामुळे अंग खाजरेचा आजार बळावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी अडचणीत सापडला आहे. घरात बसावे तर कापसामुळे आजाराची भीती बाहेर यावे तर लॉकडाऊनचे उल्लंघन या कात्रीत ग्रामीण जनता सापडली आहे. चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांना घरातच कापूस साठवून ठेवला होता. मात्र कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या आशेचे पाणी फेरले गेल्याचे चित्र दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon farmer home cottone not market corona impact