लॉकडाऊन’मुळे टळल्या लग्न घटिका...मंगल कार्यालये पडले ओस !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

पुरोहितांना सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. शहरासह तालुक्यात तीनशेच्यावर भिक्षुकी करणारे ब्राह्मण आहेत. विवाहांसह सर्व पूजा विधी बंद असल्याने सर्व जण घरीच बसून आहेत. 

चाळीसगाव ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढवण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ एकीकडे जनतेसाठी चांगले असले तरी दुसरीकडे मात्र या वाढीव ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः लग्न सोहळ्या सारख्या कार्यक्रमांवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा सर्वांना पोटाची चिंता लागली आहे. ‘लॉकडाऊन’मुळे यंदाच्या बहुतांश लग्नघटिका टळल्या आहेत. तीन आठवड्यांपासून घरोघरी तसेच मंदिरांमध्ये होणारे सर्व पूजाविधीही बंद आहेत. त्यामुळे यावरच उपजीविका असलेल्या पुरोहितांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे. 

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता, साहजिकच संचारबंदीत वाढ झाली आहे. भाजीपाला, किराणा यासारख्या अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवसाय तीन आठवड्यांपासून बंद आहेत. ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी होते, अशी देवस्थाने देखील बंद केली आहेत. शहरातील छोट्या मोठ्या मंदिरांसह पाटणादेवी, वालझिरी येथील देवालयांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास शासनाने बंदी केली आहे. यासोबतच यामुळे लग्न समारंभ, साखरपुडा, वास्तुशांती, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, बारसे, जाऊळ आदी सर्व छोटे मोठे धार्मिक विधी देखील कोणी करायला धजावत नाही. ज्या कुटुंबात बाळाचे जाऊळ काढणे अत्यावश्‍यकच आहे, अशा कुटुंबीयांनी घरच्या घरी कुटुंबात हे विधी उरकून घेतले आहेत. चाळीसगाव तालुक्यात असलेले सर्व पुरोहित वर्गाच्या हाताचे काम गेले असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र, ज्यांची उपजीविका अशा कार्यक्रमांवरच अवलंबून आहे, अशा पुरोहितांना सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. शहरासह तालुक्यात तीनशेच्यावर भिक्षुकी करणारे ब्राह्मण आहेत. विवाहांसह सर्व पूजा विधी बंद असल्याने सर्व जण घरीच बसून आहेत. 

मुहूर्तांवरील विधी टळले 
कुठलाही धार्मिक विधी करायचे म्हटले तर तो विशिष्ट मुहूर्त पाहूनच करण्याची परंपरा आहे. ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून २२ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत विविध विधींचे तब्बल २५ मुहूर्त पंचांगात होते. ज्यात चार तारखा विवाहाच्या, नऊ साखरपुड्याच्या, दोन वास्तुशांतीच्या, दोन मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या, सहा बारशाच्या व तीन जावळाच्या अशा वेगवेगळ्या २५ तारखांना असलेले मुहूर्त यंदा टळले आहेत. विवाह सोहळे होऊ न शकल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. परिणामी, वाद्यवृंदांसह सोने- चांदी, कापड दुकाने तसेच ज्या ज्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना विवाहाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन पैसे मिळतात, अशा सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल थांबल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

मागील महिन्यात अनेक विधीच्या तारखा होत्या. बरेच जण पुढील विवाहाच्या तारखा काढून घेऊन गेले होते. मात्र, ‘कोरोना’मुळे सर्वत्र ‘लॉकडाऊन असल्याने मुहूर्तावर होणारे विधीच कोणी पार पाडले नाहीत. मुख्य म्हणजे ऐन विवाहाच्या तारखांमध्ये ही वेळ आल्याने यंदा आमच्यासह अनेकांवर उपासमारीचीच वेळ आलेली आहे. 
- सुशील जोशी, पुजारी ः वालझिरी मंदिर (ता. चाळीसगाव) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Locked down 'wedding anniversary stop