ट्रकच्या धडकेत मुलगा रोडावर अन्‌ बाप ओरडला पण... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आश्रमशाळेतून मुलांना घेवून रेवसिंग पावरा यांच्या दुचाकीवर त्यांचा मुलगा ब्रिजेश पावरा (वय 5) व मुलगी सरस्वती आणि अशोक पावरा यांच्या दुचाकीवर मुलगी लक्ष्मी व मुलगा योगेश असे घेवून दोन्ही मोटारसायकली दुसखेडा जाण्यासाठी निघाले.

मेहुणबारे ता. (चाळीसगाव) ः भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीवरील पाच वर्षाचा बालक रस्त्यावर फेकला गेला. रोडाच्या मधोमध पडलेल्या मुलाच्या डोक्‍यावरून ट्रकचे चाक गेल्याने बालकाचा जागीच मृत्यु झाला. हतबल बाप हे दृश्‍य केवळ पाहत राहण्याशिवाय काहीच करू शकला नाही. 

दुसखेडा (ता. पाचोरा) येथील अशोक चिका पावरा यांची मुले व भाची मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकतात. शिवरात्रीनिमीत्त गावी कार्यक्रम असल्याने पावरा हे मुलांना घेण्यासाठी गुरुवारी मेहूणबारे येथे आले होते. त्यापूर्वी ते भाचीला भेटण्यासाठी टाकळी प्र.चा. येथे गेले. तेथून पावरा व त्यांचे मेहूणे रेवसिंग पावरा असे दोघेही मोटारसायकलीने मेहूणबारे येथे आले. 

हेपण वाचा - पाच वर्षाची चिमुरडी ती...धावली, ओरडली 

रस्त्यातच गाठले मृत्यूने 
आश्रमशाळेतून मुलांना घेवून रेवसिंग पावरा यांच्या दुचाकीवर त्यांचा मुलगा ब्रिजेश पावरा (वय 5) व मुलगी सरस्वती आणि अशोक पावरा यांच्या दुचाकीवर मुलगी लक्ष्मी व मुलगा योगेश असे घेवून दोन्ही मोटारसायकली दुसखेडा जाण्यासाठी निघाले. सायंकाळी पाचच्या सुमारास बहाळपासून शंभर मीटर अंतरावर ऋषीपांथाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या अलीकडे ऋषीपांथाकडून बहाळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच.41 जी.6834) रेवसिंग पावरा यांच्या दुचाकीला (एमएच.39 एए.8893) समोरून धडक दिली. त्यात रेवसिंग पावरा हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्याच्या उजव्या पायास जबर मार लागला. तर पुढे बसलेला ब्रिजेश हा बालक पुढे फेकला जावून ट्रकच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्‍यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर मागे बसलेली सरस्वती पावरा ही मुलगी देखील रस्त्याच्या कडेला फेकली जावून जखमी झाली. अपघात होताच ट्रक चालक पळून गेला. 

गावकरी मदतीला 
अपघाताचे वृत्त कळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहूणबारे पोलिसांना घटनेची माहिती देवून रूग्णवाहिका मागवली. तिघांना तातडीने उपचारासाठी चाळीसगाव येथे दाखल केले. मात्र ब्रिजेशचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी अशोक पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरार ट्रक चालक विरोधात मेहूणबारे पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोपाळ पाटील हे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon turck bike accident child death