हातभट्या उद्‌ध्वस्त, पुन्हा सुरू...कारवाईचा खेळ महिनाभरापासून सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावठी दारूवर कारवाई होऊनही गावठी दारू तयार करणारे पोलीसांनीही जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे.

मेहुणबारे (जळगाव) : लॉकडाऊन काळात चाळीसगाव तालुक्यात गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीला ऊत आला आहे. गेल्या महिनाभरात पोलीसांकडून झालेल्या कारवाईत आतापर्यंत हजारो रूपयांची लाखो लिटर दारू नष्ट करण्यात आली आहे. चाळीसगाव पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने जामदा, बहाळ येथे केलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावठी दारूवर कारवाई होऊनही गावठी दारू तयार करणारे पोलीसांनीही जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे.

जामदा(ता.चाळीसगाव)येथे गिरणा नदीवरील जामदा कालवा जवळ झाडाझुडपात रवि काकडे राहणार जामदा (ता.चाळीसगाव) दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हावलदार संजय काळे, प्रशांत पाटील,पोलीस मुख्यालयाचे संजू मोरे, भडगाव पोलीस ठाण्याचे नंदकिशोर निकम,कासोदा पोलीस ठाण्याचे अमोल कुमावत यांच्या पथकाने (ता. 3) रोजी सकाळी 7 वाजता छापा टाकून 15 हजार रूपये किमतीचे 500 लिटर कच्चे पक्के रसायन व 1200 रूपये किंमतीचा इतर ऐवज असा16 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट केला.या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.  

दुसऱ्या हातभट्टीवर कारवाई
 जामदा (ता.चाळीसगाव) पहील्या हातभट्टीला लागून असलेल्या विठ्ठल कोळी याच्या हातभट्टीवरही पोलीसांच्या पथकाने छापा टाकून 18 हजार रूपये किंमतीचे 600 लिटर कच्चे पक्के रसायन व इतर 1200 रूपयांचे साहित्य असे 19 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.तिसरी कारवाई  सुरेश सोनवणे याच्या हातभट्टीवर केली. 13 हजार 500 रूपये किंमतीचे 450 लिटर गुळमिश्रीत कच्चे पक्के रसायन, 1200 रूपये किमतीचे इतर साहीत्य असा 14700 रूपयांचा ऐवज जप्त करून तो जागेवरच नष्ट केला. तिघांच्या विरोधात  विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून तसेच साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहाळ येथेही कारवाई
बहाळ (ता. चाळीसगाव) येथेही मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे, पृथ्वीराज कुमावत,योगेश मांडोळे यांच्या पथकाने नाल्यातील गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून कच्चे पक्के रसायन व तयार गावठी दारू असा 34 हजार रूपयांचा ऐवज जप्त करून तो जागेवरच नष्ट केला.याप्रकरणी बाबुलाल भिल याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आजुनही काही ठिकाणी चोरुन दारु तयार केली जात आसल्याने मेहुणबारे पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु ठेवावे अशी मागणी होत आहे

कारवाईचे महिलांमधून स्वागत
ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊनही दारुबंदीचे ठरावही करण्यात आले आहेत. या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात असून या कारवाया अशाच सुरु ठेवाव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgapn mehunbare wine hatbhatti police action