घटस्फोटित, विधवांना तो विवाहाचे आमिष दाखवायचा...अखेर झाला गजाआड

residentional photo
residentional photo

नाशिक : विवाहेच्छू घटस्फोटित, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 6) अटक केली. राज्यासह परराज्यातील 50 पेक्षाही अधिक महिलांना त्याने फसविले असून, त्याच्या मागावर राज्यभरातील पोलिस होते. 

संपत चांगदेव दरवडे ऊर्फ मनोज पाटील ऊर्फ मयूर पाटील (वय 34, रा. क्रिस्टल पार्क बिल्डिंग, महमंदवाडी, हडपसर, पुणे, मूळ रा. नेवासा फाटा, कुकाना तळेवाडी, जि. नगर) असे संशयित भामट्याचे नाव आहे. विशेषत: फसवणूक झालेल्या पीडित महिलांनी एकत्रित येत पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्‍या आवळल्या. 

करामती थक्क-  करणाऱ्या

या संदर्भात मालवण (जि. सिंधुदुर्ग) पोलिस ठाण्यात गेल्या सप्टेंबरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भामट्या संपतविरोधात गुन्हे दाखल असल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, सतत नाव बदलून वावरत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान, याच भामट्याने नाशिकच्या एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवत जाळ्यात ओढले होते. त्यासाठीच तो गुरुवारी (ता. 5) महिलेला भेटण्यासाठी नाशिकला येत होता. महिलेच्या भावाने याबाबत नाशिक गुन्हे शाखेला माहिती दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी महिलेस विश्‍वासात घेऊन भामट्याला पंचवटी कारंजा येथील हॉटेल मानस येथे बोलविले व रात्री सापळा रचून संपतला अटक केली. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, दत्ता कडनोर, गोसावी, दिलीप ढुमणे, केदार, संजय गामणे, संदीप पवार यांनी ही कामगिरी बजावली. 
जरूर वाचा-
...अन्‌ सवयच लागली 
संशयित भामट्याने 2015 पासून विविध नावे बदलून घटस्फोटित, विधवांना हेरून त्यांची फसवणूक केली आहे. स्वत: विवाहित असतानाही त्याने जीवनसाथी डॉट कॉम, मेट्रोमोनी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळांवर घटस्फोटित म्हणून नावनोंदणी केली होती. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याने विवाहासाठी इच्छुक महिलांना विवाहाचे व काहींना त्यांच्या अपत्यांचेही पालनपोषण करण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घातला. 2014 मध्ये त्याचा आरती नामक महिलेशी विवाह झाला. एक अपत्यही झाले. मात्र ते प्रीमॅच्युअर असल्याने दगावले. त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले होते. त्यानंतर त्याने पुण्यात एका महिलेशी जवळीक केली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून 50 हजारांना गंडा घातला. तेव्हाच त्याला ही "मोडस ऑपरेंडी' सापडली आणि त्यानंतर त्याने नागपूर, अमरावती, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, इंदूरमधील 12 ते 15 महिलांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले. फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिसांत तक्रारीसाठी पुढे यावे, त्यांची नावे गुपित ठेवली जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

आलिशान गाड्या 
संशयित संपतने आतापर्यंत अनेकांना गंडा घालून पुण्यामध्ये स्वत:चे घर घेतले आहे. त्याच्याकडे ह्युंडाई क्रेटासह महागड्या कारही आहेत. त्याच्याविरोधात ठाणे येथे गुन्हा दाखल असून, त्यामध्ये त्यास जामीन मिळाला आहे. याशिवाय, मालवण, ठाणे, नागपूर येथेही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. 

पीडितांचा पुढाकार 
मालवण येथील पीडित महिलेने संशयिताला धडा शिकविण्यासाठी त्याच्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांचा सोशल मीडियावर "स्वीट लेडी विथ वन एम' ग्रुप तयार केला होता. या महिला सतत एकमेकींच्या संपर्कात होत्या. नाशिकमध्येही त्याने कट रचल्याचे समोर आल्यानंतर या महिलांनी एकत्रित येत नाशिक पोलिसांना सहकार्य केले आणि भामटा गजाआड झाला. या महिलांच्या धाडसाचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कौतुक तर केलेच, शिवाय त्यांना सावधगिरी बाळगण्याच्याही सूचना केल्या.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com