चाळीसगावला गुडांनी हैदोस घालून पेट्रोलपंपावर दरोडा टाकला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

दुचाकीची नंबरप्लेट आंधप्रदेशातील आहे. शिवाय ती एका स्कुटीची असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, या गुंडांनी ती मोटारसायकलला लावून तिचा वापर चोऱ्या व लुटमार.

चाळीसगाव : येथील कन्नड रस्त्यावरील सचिन पेट्रोलपंपावर काल (१३ मे) रात्री ११.२० च्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या काही गुडांनी हैदोस घालून दरोडा टाकला. पेट्रोलपंपांवरील केबीनची तोडफोड करून तेथील कर्मचाऱ्यांना या दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने मारहाण केली व कर्मचाऱ्यांजवळील ४० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी चार अज्ञात गुंडांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पेट्रोलपंप चालकांसह कर्मचाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. 

या घटनेची माहिती अशी, की कन्नड रस्त्यावरील सचिन पेट्रोलपंपावर काल (१३ मे) रात्री ११.१० च्या सुमारास मोटारसायकलवरून (एपी १० एनयु ९९७९) चार दरोडेखोर आले व त्यांनी पेट्रोलपंपाच्या केबीनच्या काचेचा दरवाजा व खिडकी तोडून आत प्रवेश केला. यावेळी पेट्रोल भरणारे कर्मचारी भिकन दिगंबर घोडे यांना लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण करून जबर दुखापत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळील ४० हजार रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली. याशिवाय दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील इतर कर्मचारी दिलीप निकम व नाना निकम यांनाही शिवीगाळ, मारहाण करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी विलास युवराज लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संपत आहेर तपास करीत आहेत. 

पोलिस अधिकाऱ्यांची भेट 
दरम्यान, सचिन पेट्रोलपंपावर दरोड्याचा हा प्रकार समजल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, उपनिरीक्षक संपत आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आरोपींना लवकरच जेरबंद करण्याचा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

दुचाकी आंधप्रदेश पासिंगची 
सचिन पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चौघे जण ज्या दुचाकीवरून आले ती दुचाकीची नंबरप्लेट आंधप्रदेशातील आहे. शिवाय ती एका स्कुटीची असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, या गुंडांनी ती मोटारसायकलला लावून तिचा वापर चोऱ्या व लुटमार करण्यासाठी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाळीसगाव परिसरात चोरीच्या दुचाकींचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. 

गुंडगिरी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान 
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुंड प्रवृत्ती कमालीची वाढली आहे. ज्यामुळे शहरासह तालुक्यात अवैध धंदे देखील फोफावले आहेत. अवैध धंदेवाल्यांकडून गुंडांना पैसे पुरविले जातात. एखाद्या हॉटेलवर जाऊन दादागिरी करून हॉटेलचे बिल न देणे, गुंडाच्या वाढदिवसाला फटाक्यांपासून इतर सर्व होणारा अनाठायी खर्च अवैध धंदे करणाऱ्यांकडून वसूल करणे ही प्रवृत्ती वाढली आहे. शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांसह गुटका विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून गुंड पोसणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chlisgaon petrol pump 40 thosand kesh robary