esakal | न्यायालयाच्या आवारात जावयाचा सासऱ्या वर चाकू हल्ला

बोलून बातमी शोधा

chaku halla
न्यायालयाच्या आवारात जावयाचा सासऱ्या वर चाकू हल्ला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चोपडा : चोपडा न्यायालयाच्या आवारातच दुपारी चेतन राजेंद्र सोनवणे (26, रा. अयोध्यागर, जळगाव) याने मोहिदा (ता चोपडा) येथील रहिवासी आनंदा भगवान बिऱ्हाडे (कोळी) यांच्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून जखमी केले आहे. न्यायालयात हल्ला चढविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
मोहिदा (ता चोपडा) येथील आनंदा भगवान बिऱ्हाडे कोळी (60) यांच्यावर जळगाव येथील अयोध्यानगरातील रहिवासी जावई चेतन राजेंद्र सोनवणे (26) याने मुख्य न्यायाधीश दालनाच्या द्वाराजवळ  दुपारी धारदार तीक्ष्ण हत्याराने अचानक हल्ला चढविला. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
मोहिदा (ता चोपडा) येथील आनंदा बिऱ्हाडे यांची मुलगी शोभाबाई हिचा विवाह जळगाव येथील रहिवासी चेतन सोनवणे यांच्याशी झाला आहे. मात्र या दोघांमध्ये प्रापंचिक कारणावरून वादविवाद होत होता. शोभाबाई या बभळाज (ता शिरपूर) येथे मोलमजुरीचे काम करण्यासाठी राहत होत्या. तर पती चेतन सोनवणे हे वाळू ठेक्यावर पर्यवेक्षक म्हणून जळगाव येथे कामास आहेत. शोभाबाईस मारहाण करीत असल्याने त्या त्याच्याकडे जात नव्हत्या. त्यातच चेतन सोनवणे हा शोभाबाईस घेण्यासाठी आला होता. मात्र तो सतत मारहाण करीत असल्याने वडील आनंदा बिऱ्हाडे यांच्या सोबत चोपडा येथे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यातच चोपडा बसस्थानकवर आपसात चर्चा करून तडजोड करण्याचे ठरले. मात्र असे झाल्यावर ही आनंदा बिऱ्हाडे व शोभाबाई सोनवणे या दोघांना तक्रार कुठे करावी हे माहिती नसल्याने ते थेट पोलीस स्टेशन ऐवजी चोपडा न्यायालयात गेले. चेतन सोनवणे यास तडजोड झाल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्याचा संशय आल्याने चेतन सोनवणे याने न्यायालयाच्या आवारातच आनंदा बिऱ्हाडे  यांच्यावर छातीच्या उजव्या बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार केला. घटनास्थळी पोलीस असल्याने त्यांनी चेतन यास पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले पकडले आणि चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.जखमी आनंदा बिऱ्हाडे  यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉ मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाने डॉ. तृप्ती पाटील यांनी उपचार केला.