तारीख जाहीर होण्यापूर्वीच सदस्य सहलीला

सुनील पाटील
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

वरून पक्षाचा निर्णय काय येतो त्या नुसार निर्णय घेऊन पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीस मदत केली जाईल. 
- प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चोपडा. 

चोपडा : येथील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती पद हे सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. सभापती निवडीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच चोपडा पंचायत समितीचे काही सदस्य सहलीला रवाना झाले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. 

चोपडा पंचायत समितीत पाच सदस्य भाजपचे, पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि दोन सदस्य शिवसेनेचे असे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. त्यात भाजपा राष्ट्रवादी सोबत जाण्याची चिन्हे दिसत असल्याने पंचायत समितीवर राष्ट्रवादी व भाजपाची सत्ता बसणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. यात सभापती पद हे राष्ट्रवादीकडे तर उपसभापती पद हे भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे सदस्य सहलीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत नुकताच भाजप सदस्यांनी पाच पैकी चार सदस्यांनी नवीन गट स्थापन केला. यातील एक सदस्य मात्र राष्ट्रवादी सोबत सहलीला गेला असून त्या सदस्याला उपसभापती पद देण्याची कबूल केले असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, यापुढे राजकीय घडामोडी कशा घडतात ? यावर अवलंबून आहे. सध्या तरी राष्ट्रवादीचे पाचही सदस्य व भाजपचा एक सदस्य सहलीला रवाना झाले असल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 

क्‍लिक करा > Video : विद्यार्थ्यांनी बसस्थानक घेतले डोक्‍यावर 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थानिक पातळीवर काय होते? सेना राष्ट्रवादी सोबत गेल्यास आरामाने बहुमत होऊ शकते. मात्र, भाजपातही गटनेता बदविल्याने चार सदस्यांचा एक नवीन गट स्थापन केल्याने भाजपा तालुकाध्यक्ष व विद्यमान सभापती आत्माराम म्हाळके हे कुणाबरोबर राहतील? चार सदस्यांच्या गटनेत्याने व्हीप जारी केल्यास राष्ट्रवादी सोबत असलेल्या भाजपाच्या सदस्याला अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

आमदारांचा निर्णय महत्वाचा 
या सर्व घडामोडीत आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राज्यात असलेल्या महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर होईल का ? आघाडी झाल्यास पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीचे पाच सदस्य व सेनेचे दोन सदस्य असे सात सदस्य मिळून बहुमत सिद्ध होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडी न झाल्यास सेनेसोबत भाजपचे किती सदस्य सोबत राहतील? हे आज तरी निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र, पंचायत समितीवर राष्ट्रवादी अथवा भाजप यांच्यापैकी कुणाचा झेंडा फडकणार हे येणारा काळच ठरविणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda panchayat samiti sabhapti date member going trip