Video : विद्यार्थ्यांनी बसस्थानक घेतले डोक्‍यावर 

बसस्थानकावर विद्यार्थ्यांचा राडा
बसस्थानकावर विद्यार्थ्यांचा राडा

जळगाव,  दोनगाव (ता. धरणगाव), रेल-लाडली बस सोडण्यास आगार नियंत्रकाने नकार दिल्याने दुपारी दोनपासून ताटकळत बसलेल्या विद्यार्थ्यांनी थेट बसस्थानकाच्या गेटवरच बसेससमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला. बसस्थानक डोक्‍यावर उचलत या विद्यार्थ्यांनी एकही बस आत येऊ दिली नाही, की बाहेरही जाऊ दिली नाही. यामुळे गोंधळ उडून वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाहतूक निरीक्षकांनी मध्यस्थी केल्यावर प्रकरण निवळले. 

नवीन बसस्थानक हे जिल्ह्यातील प्रमुख बस आगार आहे. दररोज शेकडो बसफेऱ्यांचे आवागमन होत असते. धरणगाव तालुक्‍यातील दोनगाव बुद्रूकसाठी दुपारी दोनला व साडेचारला जळगाव- लाडली बस नियमित फेऱ्या करते. या बसच्या जादा फेरीसाठी दोनगाव ग्रामपंचायतीने विनंती पत्रही दिले आहे. मात्र, त्यावर कुठलाच विचार आगारातर्फे करण्यात आलेला नाही. 


ठिय्या देत अडविल्या बस 
आज नेहमीप्रमाणे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी दुपारी दोनपासून बसच्या प्रतीक्षेत बस्थानकात उभे होते. 2 वाजेची लागली नाही तर किमान चारची बस तरी लागेल म्हणून विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रकांचे कार्यालय गाठले. येथे हजर असलेल्या कैलास पाटील या अधिकाऱ्याने "बस सोडली जाणार नाही. तुमच्याकडून जे होईल ते करा..' असे सांगितल्यावर विद्यार्थ्यांचा संताप अनावर होऊन विद्यार्थ्यांनी बसस्थानकाबाहेर जाणारा मार्ग आणि आत बस येत असलेल्या मार्गावरच बस अडवून धरल्या. अवघ्या अर्ध्या तासांत मुख्य रस्त्यावर बसेसच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. 


वाहतूक निरीक्षकांची धाव 
वाहतूक निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह वाहतूक कर्मचारी दाखल झाले. घडल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी आक्रोश करीत एकही बस जाऊ न देण्याचा पवित्रा घेतल्यावर कुनगर यांनी चर्चेसाठी विद्यार्थ्यांना तयार करून बसस्थानकात आणले. येथे हजर अधिकाऱ्यांच्या तोंडावर विद्यार्थ्यांनी खरे-खोटे करून दिल्यावर निरीक्षक कुनगर यांनी तत्काळ बस सोडण्याबाबत विचारणा केल्यावर बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. 


पाळधी बाजाराचा त्रास 
दर शुक्रवारी पाळधी गावात आठवडे बाजार भरतो, बाजार भरत असल्याचे कारण सांगत आगारातून गाड्या सोडल्या जात नाही. पूर्वी बाजाराच्या दिवशी पर्यायी मार्गाने वाहतूक होत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com