"बोहनी' न करताच परतले उद्धव साहेब..! 

सचिन जोशी
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

शेतकऱ्याला पाणी हवं, दिवसा वीज हवी, शेतमालाला भाव हवा. हे ठाकरे बोलून तर गेले, पण ते देणार का? हे मात्र सांगितलं नाही. आता ठाकरे पुन्हा कधी येणार? अशा अपेक्षा व्यक्त करण्याची संधी कधी मिळणार? जळगावकरांच्या पदरी पुन्हा त्यासाठी प्रतीक्षाच! 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काल-परवा जळगाव जिल्ह्याचा पहिलाच दौरा केला. सोबतीला ठाकरे सरकारचे "मार्गदर्शक' पवार साहेब आणि दोघे-तिघे मंत्रीही होते. त्यामुळे या पहिल्याच म्हणजे गुलाबभाऊंच्या भाषेतील "बोहनी'च्या दौऱ्यात जळगाव जिल्ह्याच्या पदरात काही पडेल, अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा काय, ते खानदेशी मुलूखमैदानी तोफेनं बोलूनही दाखवलं. पण, या तोफेचा आवाज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचलाच नाही. शेतकऱ्याला पाणी हवं, दिवसा वीज हवी, शेतमालाला भाव हवा. हे ठाकरे बोलून तर गेले, पण ते देणार का? हे मात्र सांगितलं नाही. आता ठाकरे पुन्हा कधी येणार? अशा अपेक्षा व्यक्त करण्याची संधी कधी मिळणार? जळगावकरांच्या पदरी पुन्हा त्यासाठी प्रतीक्षाच! 

नक्‍की पहा -शिक्षकाची नोकरी सोडून तिने घेतले एसटीचे स्टेअरींग हाती...मिळविला बहुमान

गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या दौऱ्याची तयारी जळगावात सुरू होती. जैन हिल्सवर द्विवार्षिक आप्पासाहेब पवार कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यास पवार न चुकता येतातच. किंबहुना पवारांच्या नियोजनावरच या सोहळ्याची तारीख ठरते. पण राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री अथवा ज्येष्ठ मंत्र्यालाही या सोहळ्यास आवर्जून आणले जाते. मुख्यमंत्री अथवा राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री येणार म्हटल्यावर त्यासाठी अन्य कार्यक्रमांचेही नियोजन केले जाते. त्यातही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्ह्यात येणार, सोबतीला पवार आणि अन्य मंत्री असताना त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची उत्सुकता होती. 
ठरल्याप्रमाणे ठाकरे व पवार जळगाव जिल्ह्यात आले. जैन हिल्सवरील कार्यक्रमाआधी पवारांचा चोपड्यातील सूतगिरणी उद्‌घाटन कार्यक्रम आटोपला होता. ठाकरे थेट जैन हिल्सवर येणार होते, त्यानंतर दुपारच्या सत्रात मुक्ताईनगरात शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. या दोन्ही कार्यक्रमांमधून जळगाव जिल्ह्याच्या पदरात काहीतरी विकासाचं दान पडेल, अशी सामान्यांची आणि विशेषत: ठाकरे सरकारचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. खरेतर "सीएम' आल्यानंतर त्यांच्याकडे स्थानिक मंत्र्याने काहीतरी अपेक्षा व्यक्त करायची आणि "सीएम'ने त्याबाबत भाषणातून घोषणा करायची, असे संकेत असतात. शनिवारी जैन हिल्सवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी शेतकऱ्यांना वीज, पाणी आणि तेलबिया संशोधन केंद्राची जागा केळी संशोधन केंद्राकडे वर्ग करण्याची अपेक्षा व्यक्त केली. "साहेब हा पहिलाच दौरा. बोहनी करूनच जा...' असेही गुलाबराव म्हणाले. उपस्थित शेतकऱ्यांमधून "दिवसा वीज तरी द्या,' असा आवाजही आला. पण गुलाबभाऊ अन्‌ त्या शेतकऱ्याचा आवाज काही साहेबांपर्यंत पोहोचला नाही. 
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे पठडीतले वाक्‍य ठाकरेंनही वापरले आणि नंतर ठाकरेंचे हेलिकॉप्टर जैन हिल्सचा निरोप घेऊन मुक्ताईनगरकडे निघाले. तेथेही ठाकरे सरकारचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्यांचाच मेळावा. जैन हिल्सवर एखादी घोषणा करायचा विसर पडला असेल, मुक्ताईच्या साक्षीने ती निघेल ठाकरेंच्या मुखातून, असे वाटले होते. मात्र, या मेळाव्यात तर सरकार पाडून दाखवाच! मुक्ताईनगर खऱ्या अर्थाने "मुक्त' झाले, अशी राजकीय आतषबाजीच झाली. म्हणजे, या ठिकाणीही "केंद्रबिंदू'च्या पदरी निराशाच. मग, या दौऱ्याने साधले काय? हा प्रश्‍न पडतो. आता पुन्हा जळगावच्या पदरी काही पाडून घ्यायचे असेल किंवा तशी घोषणा ऐकून घ्यायची असेल, तर ठाकरेंच्या पुढच्या दौऱ्याची प्रतीक्षा करावी लागेल. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cm udhav thakrey not allowanced jalgaon district sceme