रिक्षावाले काका झाले भाजीवाले भाऊ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

रिक्षा घेऊन बाहेर गेले तरी प्रवासी मिळतीलच, याची शाश्‍वती नाही. विनाकारण पेट्रोल जाळण्यापेक्षा घरी थांबलेले बरे, हा विचार करत आहेत. परंतु अशाने पोट भरणार नाही. म्हणून काही उद्योग करायचा म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. 

जळगाव : रोज काम...सकाळी उठले की ठरलेल्या दिनचर्येप्रमाणे रोजच्या कामाला लागायचे. यातून कंटाळा आलेला, अशात एक दिवस विश्रांती हवी; अशी इच्छा असून देखील घरी थांबणे होत नव्हते. परंतु आता सक्‍तीने घरी थांबावे लागतेय. यात थोडे बरे वाटले; पण रोजच घरी थांबले तर पैसे कुठून येणार. हा विचार आता सर्वसामान्य म्हणजे दिवसभर काम करून पैसे मिळविणाऱ्यांचा झाला आहे. अशात रिक्षाचालकांची कैफियतही तीच झालीय. बाहेर गेले तरी प्रवासी मिळत नाही; म्हणून अनेक रिक्षाचालकांनी आता रिक्षातून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. 
"कोरोना व्हायरस'ने संपूर्ण जगाला थांबविले आहे. देशात आणि राज्यात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमध्ये मोलमजुरी करून पोट भरणाऱ्यांचे हाल झाले आहेत. हाताला रोजगार नाही, अन्‌ पोटाला भाकर नाही, अशी स्थिती झाली आहे. रिक्षाचालकांची स्थिती याहून काही वेगळी नाही. रिक्षा घेऊन बाहेर गेले तरी प्रवासी मिळतीलच, याची शाश्‍वती नाही. विनाकारण पेट्रोल जाळण्यापेक्षा घरी थांबलेले बरे, हा विचार करत आहेत. परंतु अशाने पोट भरणार नाही. म्हणून काही उद्योग करायचा म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. 

दारोदारी जाऊन भाजीपाला विक्री 
घरासमोर रिक्षा उभी करून भागणार नाही. पोट भरण्यासाठी भाजी विक्रीचा पर्याय रिक्षाचालकांनी अवलंबला आहे. संचारबंदीत भाजीपाला, फळ किंवा जीवनावश्‍यक वस्तू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आपल्याकडील वाहनाचा उपयोग करत अनेक रिक्षाचालकांनी मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला तसेच फळ आणून ते कॉलन्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. तर अनेकजण चिवडा, शेव- मुरमुरे, चिप्स्‌चे पाकीट घेऊन विक्रीसाठी जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

घरात बसून करणार काय? 
रोजच्या कामातून सुटी मिळाली, की आनंद मिळतो. मग सुटीच्या दिवशी अपूर्ण कामे पूर्ण करायची किंवा परिवाराला घेऊन बाहेर जायचे. पण आता सुट्या तर आहेत; पण बाहेर जाणे देखील शक्‍य नाही. केवळ घरात बसून राहावे लागत आहे. ही स्थिती गेल्या आठ दिवसांपासून आहे. यामुळे घरात बसून देखील कंटाळा आल्याने नुसते घरात बसून काय करायचे? हा प्रश्‍न सर्वच नोकरदार मंडळींसह व्यापारी, मजूर व कामगारांसमोर आहे. दिवस घालविण्यासाठी वेगवेगळे पर्याय देखील शोधले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona impact auto riksha vagitable froots sells