शेतकरी कंगाल; तर व्यापारी ‘मालामाल! 

farmer
farmer

भडगाव : ‘लॉकडाउन’चे कारण सांगून शेतकऱ्यांकडून भाजीपाला कवडीमोल भावात व्यापारी खरेदी करीत आहेत. मात्र, तोच माल ग्राहकांना विक्री करताना दोन ते तीन पटींनी विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘कोरोना’चा शेती व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. 

सध्या ‘कोरोना’ने थैमान घातल्याने तिसऱ्यांदा ‘लॉकडाउन’ करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. उद्योग- व्यवसायाची चाके बंद झाली आहेत; तर हातावर पोट असणाऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचीही त्याहून वेगळी परिस्थिती नाही. कष्टाने उभे केलेले पीक मातीत गेले आहे; तर जे हाती आले, ते मातीमोल भावात विकावे लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

चढ्या भावाने विक्री 
शेतकऱ्यांनी कष्टाने भाजीपाला पिकवला. मात्र, त्यात ‘कोरोना’ने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला घास अनैसर्गिक आपत्तीने हिसकावल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या ‘लॉकडाउन’च्या काळात तर शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला अक्षरशः फेकून द्यावा लागला. आता थोड्याफार प्रमाणात बाजारपेठ सुरू झाली असली, तरी शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडीमोल भावात विकत घेऊन तोच माल ते चढ्या दराने विक्री करीत आहेत. 

तरीही भाजीपाला काढणी सुरूच 
पांढरद (ता. भडगाव) येथील शेतकरी पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले, की त्यांनी लागवड केलेली भेंडी सात ते दहा रुपये किलोने व्यापारी खरेदी करतात. मात्र, तीच भेंडी बाजारात दहा रुपयांना पाव किलोने मिळते. अशीच परिस्थिती इतर भाजीपाल्याची आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः नाडला जात आहे. पिकवलेला माल मातीत टाकण्यापेक्षा दोन पैसे हातात येतील, म्हणून ऐन ‘मे हीट’मध्येही शेतकरी शेतात भाजीपाला काढणीचे काम करीत आहेत. 

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय? 
एकीकडे शासन ‘कोरोना’मुळे अडचणीत आलेल्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेत आहे. मात्र, जो खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. त्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. अनेक शेतकऱ्यांना टरबूज रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली; तर टोमॅटो शेतातच फेकून द्यावे लागले. दुधाचे दर खाली आल्याने उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतीला व्यवसायाची जोड असलेल्या पोल्ट्री व्यवसायावर तर भले मोठे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत ‘कोरोना’मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

शासनाच्या बेफिकिरीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान 
यंदा परतीच्या पावसामुळे जलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे विहिरींनाही मुबलक साठा होते. गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने सोडण्यात आली. ज्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात ज्वारी, मका, गहू, बाजरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता आले. मात्र, शासनाने हमीभाव केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने धान्य विकावे लागत आहे. त्यामुळे ‘लॉकडाउन’ने शेतकऱ्यांना मारले आहे. पण, शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे तर शेतकरी नाडला जात आहे. अशा शेतकऱ्यांना हमीभाव व ज्या दरात त्यांनी धान्य विकले, यातील फरकाची रक्कम अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com