जळगावात बाहेरगावाहून आले साडेपाचशे जण 

भूषण श्रीखंडे
रविवार, 17 मे 2020

जळगावात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी स्वतःची तपासणी करून घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. बाहेरगावाहून आलेले किंवा येणाऱ्यांनी स्वतःसाठी तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी तपासणी करून घ्यावी. 
- संतोश वाहुळे, नोडल अधिकारी तथा महापालिका उपायुक्त, जळगाव 

जळगाव : "कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव अन्‌ त्यात जळगावचे मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांत गेलेले नागरिक पुन्हा जळगावात येत आहेत. या सर्वांची माहिती तसेच त्यांची तपासणी करण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. गेल्या पाच दिवसांत साडेपाचशे जण जे बाहेरगावाहून आले त्यांनी स्वतः येऊन तपासणी करवून घेतली. यातून एकातही "कोरोना'सदृश लक्षणे आढळून आलेली नाहीत, ही जळगावरांसाठी दिलासादायक बातमी आहे. 
जळगाव जिल्ह्यात "कोरोना'चा प्रसार वाढतच असून, आजपर्यंत 257 जण "कोरोना'बाधित आढळले. त्यात जळगाव शहरातही "कोरोना'बाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यात इतर शहरांत अडकलेले नागरिक पुन्हा स्वगृही परतत आहेत. मात्र, या नागरिकांमुळे पुन्हा शहरात "कोरोना' पसरू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात असून महापालिका उपायुक्त संतोश वाहुळे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले असून, त्यांच्या अंतर्गत पथक कार्यरत आहे. 

साडेपाचशे जणांची तपासणी 
इतर राज्यांतून तसेच राज्यातील इतर शहरांतून जळगावात अनेक जण घरी आले. त्यांना स्वतःसाठी तसेच इतरांच्या सुरक्षेसाठी तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तसेच माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चार जणांवर कारवाई केली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत साडेपाचशे जणांनी महापालिकेचे भोईटे शाळेत येऊन तपासणी केली आहे. तसेच ज्यांनी तपासणी केली नाही त्यांनी त्यांच्या व दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी तपासणीला यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

जळगावकरांसाठी दिलासा ! 
महापालिकेच्या आरोग्य व रुग्णालय विभागाचे पथक भोईटे शाळेत या नागरिकांची तपासणी करत आहे. साडेपाचशे नागरिकांची तपासणीतून एकाही नागरिकाला "कोरोना' संशयित लक्षणे आढळून आलेले नाहीत. परंतु त्यांना स्वतःच्या घरात विलगीकरण (क्वारंटाइन) करून घेण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती डॉ. विकास पाटील यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona lockdown jalgaon city come people other city