esakal | "कोरोना इफेक्‍ट' : धुळ्यातील 20 हजार रहिवासी "माहेरी'! 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, ब्राझील, इंग्लंड, सौदी अरेबिया, डेन्मार्क, दुबई, इटली, नॉर्वे, अबू धाबी, ओमान, नेपाळ आदी विविध राष्ट्रांतून तसेच देशातील परप्रांत, परजिल्ह्यातून येथे परतलेल्या काही व्यक्तींची नोंद रुग्णालयात होत आहे.

"कोरोना इफेक्‍ट' : धुळ्यातील 20 हजार रहिवासी "माहेरी'! 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : परदेशानंतर देशासह राज्यात "कोरोना'ने पाय पसरल्यावर परदेश, परप्रांत, परजिल्ह्यातून मूळ गावी परतणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत अशा सुमारे 20 ते 22 हजाराहून अधिक व्यक्ती शहरासह जिल्ह्यात परतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिस आणि जिल्हा शासकीय यंत्रणा हबकली आहे. अशा "माहेरी' परतलेल्या व्यक्तींकडे त्या- त्या भागातील नागरिक संशयाने पाहात आहेत. 

हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात संसर्गजन्य "कोरोना' विषाणूसंदर्भात विलगीकरण कक्ष सुरू आहे. येथे आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, ब्राझील, इंग्लंड, सौदी अरेबिया, डेन्मार्क, दुबई, इटली, नॉर्वे, अबू धाबी, ओमान, नेपाळ आदी विविध राष्ट्रांतून तसेच देशातील परप्रांत, परजिल्ह्यातून येथे परतलेल्या काही व्यक्तींची नोंद रुग्णालयात होत आहे. अशा व्यक्ती स्वतःहून तपासणीसाठी गेल्याने त्यांना "होम क्वारंटाईन'चा सल्ला देण्यात आला. मात्र, काही व्यक्ती या भीतीने किंवा आपल्याला काहीच आजार नाही, प्रकृती बरी असल्याच्या कारणाने घरीच थांबून आहेत किंवा नातेवाइकांशी भेटीगाठी करत असतात. 

असंख्य विद्यार्थी शिक्षण, नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सुरत, इंदूर, अहमदाबाद, बंगळूर आदी विविध ठिकाणी स्थायिक आहेत. अनेक कुटुंबीय परप्रांत, परजिल्ह्यात स्थायिक असले तरी ते अधूनमधून मालमत्ता असल्याकारणाने धुळे शहरासह जिल्ह्यात मूळ गावी येत असतात. जगासह देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने भीतीने त्या- त्या ठिकाणच्या व्यक्तींनी मूळ गावी अर्थात "माहेरी' परतण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या काही दिवसांत खासगी ट्रॅव्हल्स, एसटी, खासगी वाहने, रेल्वेव्दारे सरासरी 20 ते 22 हजाराहून अधिक व्यक्ती शहरासह जिल्ह्यात परतल्याची प्राथमिक माहिती यंत्रणेकडे आहे. "कोरोना'चा शिरकाव न झाल्याने धुळे जिल्हा सुरक्षित असल्याचे मानून संबंधित व्यक्ती धुळ्याकडे येत असून त्यांचा ओघ वाढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी "कोरोना' बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींना आता जिल्ह्यात प्रवेशबंदी केल्याने दिलासा मिळाला आहे. 

विदेशासह अन्य काही ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींची माहिती मिळताच त्यांच्याकडे त्या- त्या भागातील नागरिक संशयाने पाहात आहेत. काही व्यक्तींना परिसरातील रहिवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. तो टाळण्यासाठी संबंधित व्यक्तींनी जिल्हा रुग्णालयात रीतसर तपासणी करून घेत "होम क्‍वारंटाईन'चा शिक्का मारून घ्यावा व चौदा दिवस घरात स्वतंत्र राहावे हाच पर्याय उत्तम ठरणार आहे. या स्थितीत गंभीर पोलिसांसह आरोग्य यंत्रणेने बाहेरून आलेल्या व्यक्तींची आणि "होम क्वारंटाईन' असलेल्यांची यादी तयार करून त्यांच्यावर "वॉच' ठेवण्यास सुरवात केली आहे. "ती' व्यक्ती बाहेर फिरताना दिसली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रसंगी अटकेची कारवाई करण्याची तयारी यंत्रणेने ठेवली आहे. 
 

loading image