धुळे शहर पुन्हा रविवारपर्यंत "लॉक डाउन' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

संसर्गजन्य कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी महापालिका हद्दीत 15 मेपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत "लॉक डाउन' (संचारबंदी) लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यादव यांनी दिला.

धुळे : येथील महापालिका हद्दीत सर्वाधिक 54 आणि जिल्ह्यात एकूण 64 "कोरोना'बाधित रुग्ण आढळल्याने येथील महापालिका हद्दीत रविवारपर्यंत (ता. 17) जिल्हाधिकाऱ्यांनी "लॉक डाउन' वाढविले आहे. या संदर्भात विशेष आदेश जारी झाला आहे. 
संसर्गजन्य कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी महापालिका हद्दीत 15 मेपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत "लॉक डाउन' (संचारबंदी) लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यादव यांनी दिला. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून, त्यांनी घाबरून न जाता सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले. 

संचारबंदी लागू 
जिल्ह्याला लागून असलेल्या मालेगाव, जळगाव, अमळनेर, मध्य प्रदेशातील सेंधवा (जि. बडवानी), तसेच महापालिका हद्दीत, अन्य तालुक्‍यांत कोरोना विषाणूंच्या संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळले. त्यापैकी जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला, तर दक्षतेसाठी महापालिका हद्दीत 24 प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 64 रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूंचा प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्‍यता असल्याने जिल्हादंडाधिकारी यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या तरतुदीनुसार कोविड 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेली प्रतिबंधित क्षेत्रे वगळूनही संचारबंदी लागू राहील. 

यांना मोकळीक व सूचना 
संचारबंदीतून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या आनुषांगिक सेवा, औषधे विक्रीची दुकाने, किराणा दुकाने, शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाहतूक व धान्यवाटप, दूध, भाजीपाला व फळे विक्री दुकाने, कृषिविषयक सर्व प्रकारच्या आस्थापना, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा- सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बॅंक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रित व इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी वगळता अन्य सर्व व्यवहार हे दिलेल्या कालावधीत व अटीस अधीन राहून बंद राहतील. 

जाहीर केलेली वेळ... 
कोविड- 19 प्रतिबंधित क्षेत्रे वगळून इतर क्षेत्रांतील अधिकृत किराणा दुकाने, स्वस्त धान्य विक्रीची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन, पेट्रोलपंप सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत सुरू राहतील. नंतर ते बंद होतील. दूध विक्रेते सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत व्यवसाय करू शकतील. हा आदेश प्रतिबंधित क्षेत्रात लागू राहणार नाही. तेथे अधिसूचनेनुसार तरतुदींची अंमलबजावणी होईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus effect dhule city total lockdown sonday