कोरोनाचा थैमान : जिल्ह्याची वाटचाल डेंजर झोनकडे; शहरात कडकडीत संचारबंदी 

धनराज माळी
Saturday, 11 July 2020

कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात आल्याबरोबरच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून जिल्हा सुरक्षित ठेवला होता. महिनाभर अत्यंत सुरक्षित व राज्यात ग्रीन झोनमध्ये नंबर वन ठरलेल्या जिल्ह्यात अखेर बाहेरगावी जाऊन येणाऱ्यांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला.

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये अव्वल होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाने शिरकाव केला. मात्र, तो एवढ्या गतीने वाढत आहे, की त्याने उपाययोजनाही कुचकामी ठरू पाहत आहेत. संपर्क साखळी न तुटल्याने दररोजचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब साऱ्यांचीच चिंता वाढविणारी आहे. शुकवारी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी रविवारी (ता. १२) एकदिवसीय कडक संचारबंदी लागू केली आहे. 
कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात आल्याबरोबरच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून जिल्हा सुरक्षित ठेवला होता. महिनाभर अत्यंत सुरक्षित व राज्यात ग्रीन झोनमध्ये नंबर वन ठरलेल्या जिल्ह्यात अखेर बाहेरगावी जाऊन येणाऱ्यांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला. आता तर दररोजच्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा हळूहळू डेंजर झोनकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग अत्यंत जीव ओतून नियोजन करीत आहेत. तरीही संपर्क साखळी तोडण्यात अद्याप यश आलेले नाही. जिल्ह्यातील जनताही प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत आहे. वेळोवेळी सहकार्य करीत आहे. मात्र गर्दीत जाणे मात्र नागरिक टाळू शकलेले नाहीत. तसेच लॉकडाउन शिथिल होताच बाहेरगावी जाणे टाळू शकलेले नाहीत. त्यामुळे उपाययोजनांचा परिणाम दिसून येत नाही. 
शुकवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नंदुरबार- २० नवापूर- १,शहादा- १ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या अशी ः नंदुरबार-४२ वर्षीय महिला, ४ मुलगा, २७ वर्षीय पुरुष, ४० र्षीय पुरुष, ३३ वर्षीय पुरुष, सरस्वतीनगर नंदुरबार- ४६ वर्षीय पुरुष, मंजुळा विहार कोकणी हिल- ४२ वर्षीय पुरुष, देसाईपुरा- ३० र्षीय पुरुष, १३ वर्षीय मुलगा, पायलनगर- ४४ वर्षीय पुरुष, चौधरी गल्ली- ८० वर्षीय पुरुष, ७६ वर्षीय महिला, ४० र्षीय महिला, ५० र्षीय पुरुष, परदेशीपुरा- ४१ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय पुरुष, गांधीनगर-२५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, रायसिंगपुरा- ६० वर्षीय पुरुष, खांडबारा (ता. नवापूर)- ३८ वर्षीय पुरुष, गरीब नवाझ कॉलनी शहादा-७२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

आज संचारबंदी 
रविवारी (ता. १२) कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार नंदुरबार शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दूध व वृत्तपत्र विक्रेते यांना सकाळी नऊपर्यंत मुभा आहे. तर दवाखान्यासाठी सूट आहे. मात्र त्यासाठी दवाखान्याची फाइल सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी केले आहे. 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus nandurbar district danger one and city curfyu