माजी खासदार देविदास पिंगळे यांची "लाचलुचपत'कडून अडीच तास चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

 नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यातून धनादेशाद्वारे पैसे काढून ते बळकावण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी खासदार देविदास पिंगळे यांची दोन ते अडीच तास आज (ता.11) पुन्हा सखोल चौकशी केली. बेहिशेबी पैशांप्रकरणी विभागाने ऑक्‍टोबर 2016 मध्ये कारवाई करीत गुन्हा दाखल केला होता. तर डिसेंबर 2016 मध्ये त्यांना अटकही केली होती. 

 नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या खात्यातून धनादेशाद्वारे पैसे काढून ते बळकावण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी खासदार देविदास पिंगळे यांची दोन ते अडीच तास आज (ता.11) पुन्हा सखोल चौकशी केली. बेहिशेबी पैशांप्रकरणी विभागाने ऑक्‍टोबर 2016 मध्ये कारवाई करीत गुन्हा दाखल केला होता. तर डिसेंबर 2016 मध्ये त्यांना अटकही केली होती. 

   शरणपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आज (ता.11) सकाळी दहा वाजेच्या सुमारास माजी खासदार देविदास पिंगळे हे अधीक्षक सुनील कडासने यांच्यासमोर हजर झाले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहाराप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसंदर्भात नियमित चौकशी करण्यात आल्याचे समजते. सुमारे दोन ते अडीच तास ही चौकशी सुरू होती. त्यानंतर श्री. पिंगळे हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडले. मात्र चौकशीचे स्वरुप गोपनीय असल्याचे सांगत, बाजार समितीप्रकरणाशी निगडितच चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 
ऑक्‍टोबर 2016 मध्ये पेठरोडवरील जिल्हा बॅंकेच्या शाखेतून कृउबा समितीचे लिपीक दिगंबर हिरामण चिखले, लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन आणि स्टेनो विजय सीताराम निकम या तिघांनी 57 लाख 73 हजार 800 रुपयांची रोकड काढली. ही रोकड एमएच 15 सीएम 2180 क्रमांकाच्या कारमधून घेऊन जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरटीओ चौक ते अश्‍वमेध नगरकडे जाणाऱ्या रोड छापा टाकून कार जप्त केली असता, तिघांकडून सदरची रक्कम जप्त केली होती. या रकमेचा हिशोब न दिल्याने म्हसरुळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत माजी खासदार पिंगळे यांच्या विरोधात ठोस पुरावे आढळले होते. त्यानुसारच 21 डिसेंबर 2016 रोजी चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाले असता, दोन तासांहून अधिक वेळ चौकशीनंतर त्यांना अटक केली. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारप्रकरणीच माजी खासदार देविदास पिंगळे यांची नियमित चौकशी होती. त्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. तपासकामी आणखी चौकशीची गरज भासल्यास पाचारण करण्यात येईल. 
सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news devidas pingle