लष्करी अळी सर्वेक्षणासाठी कृषी विभाग बांधावर ; नियंत्रणासाठी जनजागृती 

तुषार देवरे
Wednesday, 15 July 2020

यंदा लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकरी चार फेरोमोन सापळे व स्पोडोप्टेरा फ्रुगीफर्डा लुर्स लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

देऊर : देऊर (ता. धुळे)सह तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या आशयाचे वृत्त सोमवारी (ता. १३) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. या बातमीची दखल जिल्हा कृषी विभागाने तत्काळ घेतली. धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुकास्तरावर समिती नियुक्ती करून प्रत्यक्ष शेती शिवारात पाहणीसाठी कृषी विभागाचे कृषी मंडळाधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे म्हणाले की, लष्करी अळी मल्टिफिडर आहे. कोणत्याही पिकावर येऊ शकते. प्राथमिक टप्प्यात अळीची अवस्था आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकरी चार फेरोमोन सापळे व स्पोडोप्टेरा फ्रुगीफर्डा लुर्स लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. जैविक नियंत्रण बिव्हेराया बॅसियाना आर्द्रता असताना पोग्यात फवारणी करावी. रासायनिक फवारणीत इमामेक्टीन बेन्झोएट अथवा डेलीगेट १० ग्रॅम मिलि प्रतीपंप फवारणी करावी. प्रत्येक मंडळात क्षेत्रीय पाहणी करून कार्यवाही सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना लष्करी अळीची माहिती देऊन मार्गदर्शिका पुस्तिका वाटप करीत आहे. 

प्रत्‍यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन 
कुसूंबा मंडळात ४ हजार ४०१ हेक्टरवर मका लागवड आहे. प्रादुर्भाव असलेल्या गावात लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जनजागृती मोहीम कृषी मित्र, शेतकरी गटाचे सहकार्य घेत आहे. क्रॉपसॅप (किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प) योजने अंतर्गत देऊर, भदाणे, नेर, खंडलाय, मोराणे प्र.नेर, लोहगड, लोणखेडी येथे मका पीक शेतकरी शेतीशाळाव्दारा शेतकऱ्यांना मंडळाधिकारी अमृत पवारसह कर्मचारी प्रत्यक्ष शेतात बांधावर जाऊन माहिती देत आहे. 

तालुकास्तरीय समिती अशी 
तालुका कृषी अधिकारी, विद्यापीठातील एक शास्त्रज्ञ, मंडळाधिकारी हे बियाणे, बोंडअळी, लष्करी अळी, पीक समस्येची दखल घेतील. 
जिल्ह्यात चारही तालुक्यात पथक नियुक्त; नियंत्रणासाठी जनजागृती 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news devur Department of Agriculture at the for military larvae survey