एकाच रात्री आठ ठिकाणी चोरी; मुद्देमालासह दिड लाख रूपये चोरीस 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

बऱ्हाणपूर अंकलेश्‍वर महामार्गावरील धानोरा (ता.चोपडा) हे सुमारे पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून बुधवारी रात्री भरवस्तीत एका पाठोपाठ तब्बल आठ ठिकाणी चोरट्यांनी घरे व दुकाने फोडत घरातील सामानाची नासधूस केली आहे. यामूळे ग्रामस्थ चांगलेच भयभित झाले आहेत.

जळगाव : धानोरा (ता.चोपडा) आज (ता.27) रात्री भरवस्तीतील आठ घर, दुकानांचे कडी कोयंडा कापुन चोरीची घटना घडली. यात दिड लाख रुपये, सोने-चांदीचे दागिने, बेंटेक्‍स सामान या वस्तु चोरीस गेल्याचे समजते. रात्रीच्या वेळी चोरांचा सुगावा लागल्याने काही ग्रामस्थांनी चोरांचा पाठलाग केला परंतू चोर पसार झाले. दरम्यान गावातील मुख्यरस्त्यांवरील घरफोड्यांमूळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
बऱ्हाणपूर अंकलेश्‍वर महामार्गावरील धानोरा (ता.चोपडा) हे सुमारे पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून बुधवारी रात्री भरवस्तीत एका पाठोपाठ तब्बल आठ ठिकाणी चोरट्यांनी घरे व दुकाने फोडत घरातील सामानाची नासधूस केली आहे. यामूळे ग्रामस्थ चांगलेच भयभित झाले आहेत. गावातील मुख्य रस्त्यावरील साहील खान यांच्या घरात घुसुन कपाटाचे नुकसान करुन सामानाची अस्तावस्त करून कपाटातील सात हजार रूपये कीमतीचा बेन्टेक्‍स चे दागिने, तीन ग्रॅमचे कानातील रिंग व इतर मौल्यवान सामान चोरीस गेला. याच रस्त्यावरील पुढे राहत असलेले कमरोद्दीन शेख यांच्या घरातील रक्कम 80 हजार रुपये,आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, या मुद्देमालासह एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. इस्लामपूर भागातील अहझर शेख यांच्या घरातुन तीनशे रुपये, लहान मुलाने जमवलेला गल्ला, बेंटेक्‍स चा किरकोळ सामान चोरीस गेला. तसेच मुख्य रस्त्यावरील किसान कृषी केंद्राचाही कडी कोयंडा तोडलेला आहे. डॉ ललित पाटील यांचे श्री समर्थ क्‍लिनिक यांचा दवाखान्याचा कडी कोयंडा तोडून त्याठिकाणी सामानाची नासधूस केली आहे. दवाखान्याच्या समोरच असलेले मनिष पॅथॉलॉजी येथील दरवाजाचे कडी कोयंडा तोडून तेथे सामानाची नासधूस केली आहे. बौद्ध वाड्यातील दोन किराणा दुकाने फोडून चिल्लर गायब केली आहे. कमरोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन अडावद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांच्या भर वस्तीतील चोरीच्या घटनेने ग्रामस्थांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

ग्रामपंचायतीचा निष्काळजी पणा 
गावात ग्रामसभेमध्ये संपुर्ण गावात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत यासाठी ग्रामनिधीतून निधी देण्याचा ठराव करण्यात आला होता मात्र आज तीन वर्ष उलटून देखील ग्रामपंचायत प्रशासनातर्फे गावात कॅमेरे लावण्यास असमर्थता दर्शवली आहे. गावात यापुर्वीही मोठमोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. गावात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोर शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांचा वचक संपला 
पोलिसांनी धानोरा व परिसरात गेल्या वर्षभरापासून रात्रीची गस्त बंद केल्याने गावासह परिसरातही चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीच्यावेळी शेतातील केबलचोरींच्या घटनाही नित्याचीच बाब झाली आहे. भूरट्या चोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. पोलिसांनी धानोरा परीसरात असलेली पोलिस मदत केंद्रे व रात्रीची गस्त बंद केल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhanora village 8 house 1.5 lakh cash robary