कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून 70 बस रवाना 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

"कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्याने दळणवळणाची साधने बंद झाली. त्यामुळे राज्यातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी "कोटा'मध्ये अडकले आहेत. विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी पालकांच्या विनंतीनुसार धुळे आगारातून 70 बस रवाना झाल्या.

धुळे : राज्यात शिक्षणाचा जसा लातूर पॅटर्न तयार झाला होता, तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे. शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात. "कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्याने दळणवळणाची साधने बंद झाली. त्यामुळे राज्यातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी "कोटा'मध्ये अडकले आहेत. विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी पालकांच्या विनंतीनुसार धुळे आगारातून 70 बस रवाना झाल्या. जिल्ह्याने राज्याचे पालकत्व निभावले असेच म्हणावे लागेल. 

"लॉकडाउन'च्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांनी केंद्र सरकार व राजस्थान शासनाशी चर्चा करून कोटात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करून आज राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 70 बस रवाना केल्या. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेऊन माघारी येतील. 
कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील व कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री परब यांच्याशी चर्चा करून बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार आज धुळे येथून 70 बस कोटाकडे रवाना झाल्या. 

 

सुविधांसह वाहनचालक रवाना 
धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटायझ करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहोचतील. व त्यानंतर विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येईल. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी संजय यादव, राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे येथील विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी आवश्‍यक ती पावले उचलून 70 बस सॅनिटायझ करून व बसमध्ये आवश्‍यक त्या सुविधा व वाहनचालकांसह रवाना केल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule 70 bus going kota maharashtra student