धुळे जिल्ह्यास ९७ कोटींचा पीकविमा मंजूर 

pik policy
pik policy

धुळे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०१९ मधील खरीप हंगामासाठी ९७ कोटी एक लाखाचा निधी मंजूर झाला. त्यात ३९ हजार ३४५ कापूस उत्पादकांच्या बचत खात्यात ७२ कोटी सहा लाखांची विमा रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित रक्कम पूर्वीच संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा झाली आहे. या खरीप हंगामात ३१ जुलैपर्यंत पीकविमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले. 
जिल्ह्यातून सुमारे दहा कोटींचा निधी पीकविमा हप्त्यापोटी भरण्यात आला होता. त्यास अनुसरून ९७ कोटींची रक्कम मंजूर झाली. एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत सहभाग नोंदवावा. त्यात निश्चित नुकसानभरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीककापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्या वर्षीचे हेक्टरी सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले, तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे. पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण देय आहे. 
काढणीपश्चात नुकसान जसे चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई निश्चित केली जाणार आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसानभरपाई वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी, महसूल विभागास द्यावी. 
 
मंडलनिहाय योजना लागू 
खरीप हंगामात पुढील नमूद पिकांसमोर दर्शविलेल्या महसूल मंडलनिहाय सर्व गावांसाठी योजना लागू आहे. अनुक्रमे पिकाचे नाव, विमा लागू असलेले क्षेत्र, विमा संरक्षित रक्कम रुपये (हेक्टरी), इतर शेतकऱ्यांनी अदा करावयाचा विमा हप्ता रुपये/हेक्टरी असा : जिल्हा- ज्वारी, २५०००, ५००; जिल्हा- बाजरी, २२०००, ४४०; जिल्हा- भुईमूग, ३५०००, ७००; जिल्हा- मका, ३००००, ६००; नागली- साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल, पिंपळनेर, कुडाशी, उमरपाटा, दहिवेल- १२५००, २५०. भात- साक्री तालुक्यातील निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, कुडाशी, उमरपाटा, दहिवेल- ३७५००, ७५०. तीळ- शिरपूर व शिंदखेडा तालुका, २४०००, ४८०. सोयाबीन- साक्री तालुक्यातील पिंपळनेर, कुडाशी, उमरपाटा, दहिवेल, ब्राह्मणवेल, शिरपूर तालुक्यातील शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, थाळनेर, सांगवी, होळनांथे, धुळे तालुक्यातील सर्व गावे, ४५०००, ९००. तूर- शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावे, ३५०००, ७००. मूग- शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावे, २००००, ४००. उडीद- धुळे तालुक्यातील शिरूड, बोरकुंड, आर्वी, सोनगीर, नगाव बुद्रुक, फागणे, मुकटी, लामकानी, साक्री तालुक्यातील साक्री, दुसाणे, ब्राह्मणवेल, कुडाशी, उमरपाटा, दहिवेल, शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा, चिमठाणे, शेवाडे, खलाणे, नरडाणे, वर्शी, विखरण, विरदेल, बेटावद, दोंडाईचा, शिरपूर तालुक्यातील शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, सांगवी, थाळनेर या महसूल मंडळांतील समाविष्ट सर्व गावांसाठी, रुपये २००००, ४००. कापूस, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील सर्व गावे, धुळे तालुक्यातील शिरूड, बोरकुंड, आर्वी, सोनगीर, नगाव बुद्रुक, फागणे, मुकटी, धुळे ग्रामीण, कुसुंबा, नेर (म. रायवट), लामकानी, साक्री तालुक्यातील साक्री, कासारे, म्हसदी (प्र.ने.), दुसाणे, निजामपूर, ब्राह्मणवेल, दहिवेल- ४५०००, २२५०. खरीप कांदा- धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावे, ६५०००, ३२५०. 

शेतकऱ्यांना आवाहन 
शेतकऱ्यांनी बँकेत विमा हप्ता व पेरणीची नोंद असलेला सातबारा आदी कागदपत्रे राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेकडून सादर केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ घेता येईल. गावपातळीवर पूरक नोंदणी सेवा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांचे अर्ज विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत (CSC) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास मान्यता आहे. राज्यात सीएससीई गव्हर्नस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडतर्फे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) अर्ज भरण्यासाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन आहे. 
 
श्रेयाचा यांनी केला दावा... 
कापसाच्या पीकविमा नुकसानभरपाईच्या मंजुरीचे श्रेय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा कृषी अधीक्षक सोनवणे व सहकाऱ्यांचे आहे. खरिपातील २०१९ मध्ये इतर पिकांना २५ कोटी व कापसाला ७२ कोटी, अशी ९७ कोटींची भरपाई मंजूर झाली. धुळे तालुक्यातील २१ हजार शेतकऱ्यांना ४५ कोटी ७७ लाख, साक्री तालुक्यातील चार शेतकऱ्यांना आठ कोटी ४१ लाख, शिरपूर तालुक्यातील सहा हजार ४५२ शेतकऱ्यांना ११ कोटी ६६ लाख, शिंदखेडा तालुक्यातील सात हजार ७०० शेतकऱ्यांना सहा कोटी २१ लाख मंजूर झाले. यात ज्यांनी उंबरठा उत्पादन कमी केले तेच आता फुकटचे श्रेय घेण्यासाठी धडपडत असल्याचे व याप्रश्‍नी सतत पाठपुरावे करणारे कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे. ही भरपाई मंजुरी सतत पाठपुराव्याचे, तसेच जिल्हाधिकारी यादव यांच्या सहकार्याचे फलित असल्याचे आमदार कुणाल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com