अंगावर पुरेसे कपडे ना हौसमौज; `त्यांच्या` गावी सुविधांचा झरा झिरपलाच नाही! 

निखिल सूर्यवंशी
Thursday, 8 October 2020

पाड्यांकडे जाताना वीजखांब आहेत. मात्र, तारा नाहीत. रस्त्यांचा पत्ता नाही. शेतकरी नाल्यातून वाहनाने वाट तुडवत जातात, तर पाठीवर ओझे घेऊन रस्त्यांअभावी पायपीट करत घरी जाणारे शेतकरी या पाड्यांमध्ये दिसतात. मोबाईलची रेंज नसल्याने डिजिटल जगाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही.

धुळे : शहरीकरणाच्या सुविधांपासून, विकासाच्या झऱ्यापासून कोसो मैल दूर... अंगावर पुरेसे कपडे ना हौसमौज... ना रस्ते माहीत ना वीज.. .ऑनलाइन- ऑफलाइन शिक्षणाचा गंध नाही... मुलांना पिझ्झा, चॉकलेट माहिती नाही, तर गुरे चारणे, सालदारकीच त्यांच्या नशिबी... पोटाची खळगी भरण्यासाठी काबाडकष्ट, मोळी विक्रीसाठी २० किलोमीटरची पायपीट महिलांच्या पाचवीला पुजलेली, असे हे वेगळे जग आजही पाहायला मिळते शिरपूर तालुक्यातील थुहानपाणी, निशानपाणी, कढईपाणी अशा मागास आदिवासी पाड्यांमध्ये. ते अनुभवलं धुळे शहरातील प्रबोधन फाउंडेशनने..! 
हरहुन्नरी, समाजाप्रतिसंवेदनशील, परखड वक्ते आणि प्रबोधन फाउंडेशनचे प्रवर्तक ॲड. अभिनय दरवडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे येथील माजी अध्यक्ष प्रा. भास्कर दरवडे आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनी धुळे शहरापासून ९५ किलोमीटरवरील आदिवासीबहुल शिरपूर तालुक्यातील पाड्यांमध्ये वैद्यकीय तपासणी व औषधोपचाराचा निर्णय घेतला. त्यांना गुऱ्हाळपाणी बऱ्यापैकी विकसीत दिसले. मात्र, थुहानपाणी, निशानपाणी, कढईपाणी व परिसरातील इतर आदिवासी पाडे आजही मागास असल्याचे दिसून आले. 

सोयी सुविधांपासून वंचित 
काही पाड्यांकडे जाताना वीजखांब आहेत. मात्र, तारा नाहीत. रस्त्यांचा पत्ता नाही. शेतकरी नाल्यातून वाहनाने वाट तुडवत जातात, तर पाठीवर ओझे घेऊन रस्त्यांअभावी पायपीट करत घरी जाणारे शेतकरी या पाड्यांमध्ये दिसतात. मोबाईलची रेंज नसल्याने डिजिटल जगाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने मुले गुरे चारणे, सालदारकीत गुंतलेले दिसतात. परिसरात धबधबे, ओढे आणि निसर्ग निवांत पहुडलेला असला तरी संबंधित पाडे मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. विकासाचा झरा त्यांच्या गावी झिरपलाच नसल्याने उपेक्षितांचे जिणे आदिवासी बांधवांच्या नशिबी आहे. 

नशिबी सतत काबाडकष्टच 
पोटाची खळगी भरण्यासाठी महिला जंगलातून मोळी आणतात. डोक्यावर ४० ते ५० किलोची मोळी घेऊन दहा ते २० किलोमीटर पायपीट करून ९० ते १०० रुपयांना विकतात. त्यातून घरी येताना किराणा घेतात आणि दिवस भागवतात. या पाड्यांच्या काही मीटरवर मध्य प्रदेशची सीमा आहे. विजेसह कुठल्याच सो-यीसुविधा नसल्याने त्यांच्या नशिबी हौसमौज नाही, तर केवळ काबाडकष्ट दिसतात. गावात डॉक्टर किंवा अनोळखी व्यक्ती आला तर अंगावर पुरेसे कपडे नसल्याने लहान मुले- मुली लाजून घरात पळतात, ही विदारक स्थिती प्रबोधन फाउंडेशनने अनुभवली. मात्र, ती शासन, प्रशासनाने का नाही, असा प्रश्‍न आता मनात घर करून आहे. 

औषधांचे मोफत वितरण 
गुऱ्हाळपाणी, कढईपाणी आदी आदिवासी पाड्यांमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांनी बालकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली. त्यांच्या पालकांचे प्रबोधन केले. संबंधित पाडे कोरोना, मास्कच्या वापरापासून अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule aadivashi pada people no development