आदिवासी पाड्यांवर पोहचणार दवाखाना

भरत बागूल
Monday, 21 September 2020

डॉ. वसावे यांनाही समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी स्वत:च्या डॉक्टर पेशातूनच समाजसेवा करण्याचे ठरविले व फिरत्या दवाखान्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली.

पिंपळनेर (धुळे) : आदिवासी समाज व गोरगरिबांसाठी डॉ. उल्हास जयंत बसाये यांचा आश्रय- दुर्ग संस्थेची ‘फिरता दवाखाना’ प्रकल्पाची गाडी शनिवारी (१९ सप्टेंबर) साक्री तालुक्यातील वार्सा, मांजरी भागात फिरली. या ठिकाणी आदिवासींच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. 

डॉ. वसावे यांनाही समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी स्वत:च्या डॉक्टर पेशातूनच समाजसेवा करण्याचे ठरविले व फिरत्या दवाखान्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. या प्रकल्पाचे उद्‌घाटन माजी आमदार योगेश भोये यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सातआंबा शाळेचे शिक्षक प्रवीण गांगुर्डे यांनी आदिवासी समाजाच्या आरोग्यासंबंधी डॉ. वसावे यांच्याकडे समस्या व आदिवासी समाजबांधव अजूनही दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही, अशी व्यथा मांडलेली होती. 

पंधरा दिवसातून गाडी येणार
आता मांजरी, शेंदवड व वार्सा या भागात हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू केला आहे. या भागात १५ दिवसांतून फिरत्या दवाखान्याची गाडी येईल, त्यात डॉक्टर, नर्स असतील. आरोग्य तपासणी होऊन रुग्णाला आता त्यांच्या दारीच दवाखाना उपलब्ध होणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांची धावपळ थांबून उपचार मिळणार आहेत. 
कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य रमेश गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य शांताराम कुवर, जळगाव सरपंच किरण बागुल, वार्सा येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत राऊत, माजी सरपंच संजय राऊत, अहवाडांग बिजुरपाड्याचे सरपंच बाज्याही कार्यक्रमास उपस्थित होते. शिक्षक प्रवीण गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. संभाजी आंधळे यांनी सूत्रसंचालन केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule aadivasi pada home to home hospital