esakal | विविध शैक्षणिक मागण्यांसाठी‘अभाविप’चा ५ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा 
sakal

बोलून बातमी शोधा

विविध शैक्षणिक मागण्यांसाठी‘अभाविप’चा ५ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा 

खासगी विद्यापीठे तसेच शासकीय विद्यापीठांचे ३० टक्के शैक्षणिक शुल्क राज्य सरकारने माफ करावे. चुकीच्या निकालांचे तात्काळ पुनर्मूल्यांकन करावे.

विविध शैक्षणिक मागण्यांसाठी‘अभाविप’चा ५ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे  ः विविध शैक्षणिक मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ५ सप्टेंबरला धुळ्यात विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करत मंत्री श्री. सत्तार यांनी संपूर्ण शैक्षणिक परिवाराची माफी मागावी, अशी मागणीही केली. निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जांवर शैक्षणिक पात्रतेच्या उल्लेखावरूनही ‘अभाविप’ने श्री. सत्तार यांना लक्ष्य केले आहे. 
‘कोरोना’मुळे उद्‍भवलेल्या शैक्षणिक व आर्थिक समस्यांबाबत ‘अभाविप’ने मागण्यांच्या अनुषंगाने भूमिका घेतली आहे. या मागण्यांच्या अनुषंगाने ५ सप्टेंबरला धुळ्यात होणाऱ्या विद्यार्थी आक्रोश मोर्चाबाबत ‘अभाविप’चे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे, प्रदेश सहमंत्री विराज भामरे, जिल्हाप्रमुख अमोल मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व त्यांच्या बालहट्टामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यहित लक्षात घेता विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचवलेल्या पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, प्रथम व द्वितीय व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे तसेच राज्यातील सर्व महाविद्यालय, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे तसेच शासकीय विद्यापीठांचे ३० टक्के शैक्षणिक शुल्क राज्य सरकारने माफ करावे. चुकीच्या निकालांचे तात्काळ पुनर्मूल्यांकन करावे, खाजगी विद्यापीठाच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा किंवा खाजगी विद्यापीठे हे शुल्क निर्धारण समितीच्या अंतर्गत घेण्यात यावे, मार्च, मे, जून या कालावधीत वसतिगृहे बंद होती, तर वसतिगृह व मेस शुल्क १०० टक्के परत करावे, इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांच्या शुल्कावर अंकुश लावावा या मागण्यांसाठी अभाविप राज्यभरात निवेदने देत आहे, आंदोलन करत आहे. दरम्यान, या मागण्यांसाठी ५ सप्टेंबरला ‘अभाविप’तर्फे विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 
शैक्षणिक पात्रतेवर प्रश्‍नचिन्ह‍ 
मंत्री सत्तार यांनी २००४, २००९, २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जात उल्लेख केलेल्या शैक्षणिक पात्रतेत तफावत असल्याचे म्हणत श्री. सत्तार यांचे शिक्षण किती झाले असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची सत्यता तपासण्यात यावी आणि खोटी माहिती असल्यास त्यांची आमदारकी रद्द करावी, कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘अभाविप’चे प्रदेशमंत्री बेगडे यांनी केली. 
 

loading image