esakal | वीजचोरी करणाऱ्यांवर धुळ्यात होणार कारवाई  !
sakal

बोलून बातमी शोधा

वीजचोरी करणाऱ्यांवर धुळ्यात होणार कारवाई  !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर आढावा बैठक होईल, असे सांगितले. समन्वयाने कामांची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

वीजचोरी करणाऱ्यांवर धुळ्यात होणार कारवाई  !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः येथील जिल्हा विकास व सनियंत्रण समितीच्या (दिशा) सभेत वीज कंपनीला लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांनी शॉक दिला. त्यात वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश सभेने दिले. 

समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी संजय यादव, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., आयुक्त अजीज शेख, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तृप्ती धोडमिसे व्यासपीठावर होत्या. 

वीजचोरी रोखण्यासाठी पोलीसांची मदत 

खासदार भामरे म्हणाले, की लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी करावी. वीज कंपनीने भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण करावे. भारनियमन होणार नाही याची काळजी घ्यावी. वीजचोरी रोखण्यासाठी आवश्यक तेथे पोलिसांची मदत घ्यावी. धुळे शहरात दोन दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्यामुळे घडलेल्या घटनेतील मृताच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई द्यावी. त्यातील दोषींवर कारवाई करावी. धुळे शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी. वेलनेस सेंटर या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. 


खासदार गावित यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यासाठी अंगणवाडीसेविका आणि आशा कार्यकर्तींमध्ये समन्वय असावा, अशी सूचना केली. दोन्ही खासदारांनी राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आदिवासी विकास विभागाकडील केंद्र पुरस्कृत योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीयोजना आदींचा आढावा घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर आढावा बैठक होईल, असे सांगितले. समन्वयाने कामांची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. चर्चेत श्री. रंधे, श्री. पावरा, धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, अशासकीय सदस्य सुनील बैसाणे, अनुप अग्रवाल आदींनी भाग घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन यांनी आभार मानले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे