धुळ्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

महापालिका आयुक्तांनी विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणुन नियुक्ती केली. या अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक झाली. 

 
धुळे ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त झोनल अधिकाऱ्यांची महापालिकेत अखेर बैठक झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे या अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हे अधिकारी आता प्रत्यक्ष फिल्डवर उतरतील आणि शहरात विनाकारण फिरणाऱ्या गर्दीला रोखण्यात यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका शहरात दिवसेंदिवस वाढत असताना शहरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या संचारबंदी आदेशाचाही फज्जा उडाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या, प्रत्यक्ष चित्रही तसेच निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्तांना आदेश काढुन झोनल अधिकाऱ्यांची नेमणुक करुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणुन नियुक्ती केली. या अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक झाली. 

उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, तुषार नेरकर आदी उपस्थित होते. झोनल अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या प्रभागात जाऊन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या अनुषंगाने काम करायचे आहे. शिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये कार्यरत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही अडचणी असतील, तर त्याही दूर करण्यासाठी मदत करायची आहे. त्यामुळे किमान हे अधिकारी आजपासून (बुधवार) प्रत्यक्ष कामाला सुरवात करतील व त्याचे सकारात्मक परिणाम समोर येतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, नियुक्त अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Action taken against those violating curfew in Dhule