अटी, शर्तींच्या अधीन राहून ‘बँड’ला परवानगीचा विचार : दादा भुसे 

जगन्नाथ पाटील
Sunday, 23 August 2020

राज्य बँड संघटनेने दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे की, पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  लॉकडाउन सुरु आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अनलॉकचे विविध टप्पेही सुरु झाले आहेत. विविध कार्यक्रमांनाही विशिष्ट अटींनुसार परवानगी मिळत आहे.

कापडणे : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे जन जिवन पूर्वपदावर येण्यास बऱ्याच अडचणी आहेत. बँड व्यवसायिकांच्या समस्या समजू शकतो. व्यवसायास परवानगीची मागणी होत आहे. गेल्या महिन्यापासून शासनाचा परवानगीचा विचार सुरु आहे. विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्याचा विचार सुरु असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

धुळे जिल्ह्यातील बँड मालक व कलाकार उत्कर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री भुसे यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी बँड व्यावसायिकांच्या समस्या समजून घेतल्या. समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. 
राज्य बँड संघटनेने दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे की, पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  लॉकडाउन सुरु आहे. गेल्या दीड महिन्यांपासून अनलॉकचे विविध टप्पेही सुरु झाले आहेत. विविध कार्यक्रमांनाही विशिष्ट अटींनुसार परवानगी मिळत आहे. जवळपास नव्वद टक्के व्यवसाय सुरु झाले आहेत. अद्यापही बँड व्यवसायावर बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे हे व्यवसायिक पूर्णतः बेरोजगार झालेले आहेत. दहा लाखांवर कर्ज उचलून हा व्यवसाय सुरु केलेला आहे. कलाकारांनाही उचल दिलेली असते. यावर्षी पुर्णतः बरबाद झालो आहोत. हफ्ते फेडू शकत नाहीत. खासगी सावकारांचा तगादा सुरु झाला आहे. व्यवसाय मालकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. दुसरा व्यवसाय करु शकत नाही. या व्यवसायातील वाजंत्री कलाकारांना पाच महिन्यांपासून हाती काम नाही. विविध अटींना अधिन राहून व्यवसायाला परवानगी द्यावी. अशी मागणी केली आहे. निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत सांळुके, संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, माजी अध्यक्ष प्रदीप वायपूरकर, शिवाजी गुरव, भिकन पाटील, विजय गुरव आदी उपस्थित होते.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule after corona band and dhol parmeetion allow rules minister dada bhuse